अहिल्यानगर : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य तपास करत आहेत. मात्र, कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई सापडलेत. त्या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. जे कोणी या पार्टीत आढळले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर आणि योग्य ती कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते अहिल्यानगर दौऱ्यावर होते. त्या दरम्यान ते माध्यमांशी बोलले.
खराडी परिसरातील रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक केली. यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान ठाकरे बंधू भेटीवर बोलताना ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील हा कौटुंबिक विषय आहे. दोन भाऊ अनेक वर्षांनी एकत्र आले तर त्यात आनंदच मानायला हवा. यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही.