दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे लहान बाळाला काहीही झाले की, घरातील आजी घरगुती उपचार करून बाळाला ठीक करे. आजीबाईचा बटवा म्हणून तो ओळखला जाई. कालपरत्वे उद्योग-व्यवसायामुळे कुटुंबे विभक्त झाली. बाळाला जरा काही झाले की डॉक्टरकडे पालक धाव घेऊ लागले. आजीबाईचा बटवा काळाच्या ओघात मागे पडला. या चक्रातून ती सुद्धा गेली. तिला जाणवलेल्या समस्येवर तिला उपाय सापडला आणि या उपायाचे तिने व्यवसायात रूपांतर केले. ही गोष्ट आहे रिद्धी शर्मा या आईची आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या तिच्या बेबी ऑरगॅनो या उद्योगाची.
गुजरातच्या जामनगरमधील रिद्धीने कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदा काम करायला सुरुवात केली. तेव्हा तिचा पगार महिन्याला फक्त २५०० रुपये होता. ही काही फार मोठी रक्कम नव्हती; परंतु त्यामुळे तिला तिचे आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. तिला तिच्या आई-बाबांकडे पैसे मागावे लागले नाहीत. २००८ मध्ये विद्यानगरच्या जी. एच. पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून आयटीमध्ये बीई पदवी प्राप्त केल्यावर रिद्धीने सुरुवातीला त्याच शहरातील एका आयटी फर्ममध्ये कोडर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
पण करिअरच्या एका वळणावर तिच्या लक्षात आले की, ती विपणन कलेत उजवी आहे. तेव्हा तिने कंपनीमध्ये आपले प्रोफाइल बदलून घेतले. मार्केटिंग क्षेत्रातील तिच्या कौशल्यामुळे तिला बढती मिळाली. त्या आयटी फर्मच्या संस्थापकांसोबत थेट काम करण्याची तिला संधी मिळाली. याच फर्ममध्ये असताना रिद्धीची ओळख अहमदाबादमधील ओपन एक्सेलमध्ये काम करणाऱ्या रिपुल शर्माशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. २०११ पर्यंत, दोघेही आपापल्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर पोहोचले. रिद्धी टीम लीडर आणि रिपुल सीनियर डेव्हलपर व टीम लीडर म्हणून काम करू लागले.
पण आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या रिद्धी-रिपुल यांनी त्याचवर्षी वेबपिक्सेल टेक्नॉलॉजी सुरू केली. ही कंपनी वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, एसईओ सेवा आणि वेब देखभाल आणि होस्टिंगसारखी सेवा देते. रिपुल आणि रिद्धीने बचतीतून साठवलेले ५०,००० रुपये एकत्र करून वेबपिक्सेल सुरू केले. त्यांनी अहमदाबादमधील पालदी येथील ५०० चौरस फुटांच्या एका छोट्या ऑफिसमधून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते फक्त दोघेच होते. हळूहळू दोन डेव्हलपर्स आणि एक डिझायनर हे वेब पिक्सेलमध्ये सामील झाले. व्यवसायाच्या पहिल्या वर्षात, त्यांनी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
पूर्णवेळ नोकरी करत वेबपिक्सेल वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यांना अमेरिकेतून काही क्लायंट मिळाले. दिवसा नोकरी तर संध्याकाळी व्यवसाय अशा कसरती सुरू होत्या. या कठोर वेळापत्रकामुळे त्यांना फक्त ३ ते ४ तासांचीच झोप मिळायची. व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसा त्यांची टीम देखील वाढली. सध्या वेबपिक्सेल टेक्नॉलॉजीमध्ये ४० कर्मचाऱ्यांची टीम आहे. ती जगभरातील क्लायंटना सेवा देते.
२०१८ मध्ये, रिद्धीने प्रसूती रजेसाठी ब्रेक घेतला. पहिल्यांदाच आई होणार असल्याने, ती तिच्या बाळासाठी योग्य आरोग्यदायी उत्पादने निवडण्यास उत्सुक होती. नावाजलेल्या ब्रँडच्या बाळांसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांमधील घटकांबद्दल तिला शंका होती. तिच्या ८९ वर्षीय आजीने, तिच्यासोबत काही काळ राहून बाळासाठी घरगुती आयुर्वेदिक उत्पादने तयार केली. उटणे पावडर, हळद, हरभरा पीठ आणि चंदन यांचे मिश्रण तयार केले, जे बाळाच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. बाळाच्या शरीरावर मालिश करण्यासाठी ही उटणे पावडर पाणी, दही किंवा दुधात मिसळून लावली जाते. तिने ऑलिव्ह ऑइल, गव्हाचे तंतू तेल, बदाम तेल आणि तीळाच्या तेलाच्या मिश्रणापासून घरगुती बाळ मालिश तेल देखील बनवले.
रिद्धीचा बाळांसाठी आयुर्वेदिक आरोग्याचा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा रिद्धीचे बाळ ४-५ महिन्यांचे होते. तेव्हा त्याचे पोट दुखत होते. तिच्या आजीने बाळाच्या नाभीवर पातळ केलेला हिंग लावला. या उपायामुळे कायान शांत झोपत असे. सहा महिन्यांनंतर तिची आजी तिच्या घरी परतली. रिद्धी देखील आपल्या उद्योगात गुंतली. मात्र कायानसाठी तिला ही घरगुती उत्पादने बनवण्यासाठी वेळ नव्हता. तिने आयुर्वेदिक बेबी केअर उत्पादने शोधली पण तिला विशेषतः बाळांसाठी सेवा देणारे कोणतेही भारतीय ब्रँड सापडले नाहीत. ही पोकळी तिला उद्योजक बनवून गेली. मार्च २०२० मध्ये, रिद्धीने २ लाख रुपयांची गुंतवणूक करत बाळांना समर्पित असा बेबीऑर्गानो हा आयुर्वेदिक ब्रँड लाँच केला. हा व्यवसाय तिने घरातूनच सुरू केला. तिने ब्रँडचे पहिले उत्पादन म्हणून हिंग रोल ऑन बाजारात आणले. हिंग तेल, आल्याचे तेल आणि सोवा तेलाच्या मिश्रणाने पोटदुखी कमी करण्यासाठी हे उत्पादन फायदेशीर आहे असा तिचा दावा होता. एका उत्पादकासोबत भागीदारी करून, रिद्धीने बेबीऑर्गानोच्या उत्पादनांसाठी आवश्यक असलेले सर्व घटक पुरवले, ज्याची सुरुवात १३ वेगवेगळ्या वस्तूंनी झाली. यापैकी काहींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरणशक्तीसाठी बालप्राशन, स्वर्णप्राशन, पोषणासाठी हर्बल चोकोविटा आणि त्वचेच्या काळजीसाठी नॅचरल उटणे यांचा समावेश आहे. या उत्पादनाच्या किमती १५० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत. या उत्पादनांना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. पहिल्या सहा महिन्यांत या व्यवसायाने दरमहा सुमारे १०,००० रुपयांची उलाढाल केली. ही उलाढाल प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रातून झाली. २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार त्यांच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस बेबीऑरगॅनोने ८ लाख रुपये कमावले, तर पुढील वर्षी महसूल ३७ लाख रुपयांपर्यंत वाढला. एका वेबसाइटच्या वृत्तानुसार सध्या कंपनीची उलाढाल ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांची ९०% विक्री ही त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवरून येते, तर उर्वरित १०% विक्री अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून होते. ऑगस्ट २०२३ च्या अखेरीस, बेबीऑरगॅनोला डेव्हएक्स वेंचरकडून १.२५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. बेबीऑरगॅनो भारताबाहेर सुद्धा वाढत आहे. ब्रँडने अमेझॉन यूएसएद्वारे अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश केला आहे. यूएई आणि मध्य पूर्वेमध्ये विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. पुढील आर्थिक वर्षांत २५ कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मातृत्वातून उद्योजकतेकडे झेप घेणारी रिद्धी शर्मा खऱ्या अर्थाने लेडी बॉस आहे.