Saturday, August 2, 2025

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांवर पहिल्यांदाच व्यक्त झाले धनंजय मुंडे, काय म्हणाले पहा...

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांवर पहिल्यांदाच व्यक्त झाले धनंजय मुंडे, काय म्हणाले पहा...

परळी: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण गेल्यावर्षी इतके तापले की त्याचा फटका धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यात दोषी सिद्ध झाल्यानंतर, विरोधकांकडून धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करण्यात आले. इतकेच नव्हे तर यामुळे सामाजिक नाचक्की झाली ती वेगळीच! मात्र धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगले होते, पण आता पाहिल्यांदाच ते याबद्दल व्यक्त झाले. वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल ते बोलत होते.


संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर त्यांनी सुमारे २०० दिवस सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती. मात्र वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांनी उपस्थिती लावली, या दरम्यान त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.



काय म्हणाले धनंजय मुंडे?


जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे. आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई येणार होत्या. पण त्या म्हणाल्या मी मागे राहते, भाऊ चालला आहे. तूच माझ्या वतीने शुभेच्छा दे. त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. इतके दिवस तुम्ही बोलावत नव्हता. म्हणून मला येता येत नव्हते. आता तुम्ही बोलावलं तर मी आलोय. जीवनातला पहिला संघर्ष डोळ्यासमोर मुंडे साहेबांचा पाहिला. जीवनातला प्रवास आठवला तरी आता सुद्धा अंगावर शहारा येतो.



त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय


स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले तेही पाहिलं. जे व्हायला नको होत ते झालं. पण कधी-कधी वाटत की साहेबांची एवढी दूरदृष्टी होती. मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्री मंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते. आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे ते सर्व स्वीकारेन. टीका स्वीकारेन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये. प्रत्येकाने करावं तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा. धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत नसावा. धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत हे कधीच झाले नाही. माझ्यासह, जात माझ्यासह इतर जात आणि माझ्यासह माझा जिल्हा एवढा बदनाम करावा. एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही, ते मी सहन केले. त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.



सत्य परेशान हो सकता है, पराजित नही


कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी अनेक आरोप केले. मात्र नियतीने आणि न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्याच्या विरोधातच लाख रुपयाचा दंड झाला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. असे ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा