Saturday, August 2, 2025

वेडे धाडस...

वेडे धाडस...

कथा : रमेश तांबे


अभयला आपल्या मित्रांसोबत पावसाळी सहलीला जायचं होतं. पण आई-बाबांची परवानगी कशी मिळवावी याचीच चिंता त्याला लागून राहिली होती. एक दिवस सहलीचा विषय त्यांने आई-बाबांकडे काढलाच. पण काय आश्चर्य बाबांनी त्याला लगेच परवानगी दिली. “भलते धाडस करू नकोस. स्वतःची आणि तुझ्या मित्रांचीसुद्धा काळजी घे. पावसापाण्याचे दिवस आहेत. तेव्हा मजा करा; पण जरा जपूनच” आईने अभयला सल्ला दिला. अभयने मान हलवली आणि धन्यवाद आई-बाबा असे म्हणत तो त्यांच्या गळ्यात पडला.


अभय नुकताच कॉलेजला जाऊ लागला होता. तारुण्य सुलभ वय, नवे वातावरण, नवे मित्र यात अभय चांगलाच रमला होता. पावसाळी सहलीसाठी माळशेज घाटात जायचं असा मित्रांचा बेत होता. पाच-सहा मुली, सात-आठ मुलगे असा त्यांचा मित्रांचा गट रविवारच्या दिवशी सहलीसाठी निघणार होता. एसटी बस पकडून घाटाच्या पायथ्याशी जायचं अन् पावसाळी आनंद घेत रस्त्यावरून फिरायचं असा बेत होता. पहाटे सहाची गाडी पकडून सर्वजण तीन तासांतच घाटाच्या पायथ्याशी उतरले. उंचच उंच डोंगरकडे, हिरवी गर्द झाडी, दूरवर दिसणारे निळे डोंगर, पांढऱ्याशुभ्र पाण्याचे फेसाळत पडणारे धबधबे, खळखळणारी नदी, ओढे, नाले! अभयसह सारेच खूश झाले. असं निसर्गरम्य वातावरण अभय पहिल्यांदाच अनुभवत होता.


आकाशात काही छोटे ढग वाऱ्याच्या वेगाने पळत होते. हिरव्यागार कुरणाला चिरत जाणारे काळे रस्ते अतिशय सुंदर दिसत होते. डोंगर उतारावर ओळीने उभी असलेली झाडी जणू आकाशातील ढगांचा खेळ पाहत आहे असे वाटत होते. तेवढ्यात पावसाची एक हलकी सर येऊन गेली. सगळेजण पावसात चिंबचिंब भिजले आणि काय आश्चर्य त्या रिमझिम पावसात पश्चिमेच्या दिशेला एक नयनरम्य इंंद्रधनुष्य दिसू लागले. ते सप्तरंगी इंद्रधनुष्य बघता बघता अभय हरखून गेला. आता ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. अभयच्या काही मित्रांना पाण्यात डुंबायचं होतं. काहींना धबधब्याखाली उभं राहून भिजायचं होतं. म्हणून दोघा-तिघांनी धबधब्याच्या दिशेने जायचं ठरवलं.


अभय सगळ्यांना म्हणाला, “अरे सचिन, अरे अशोक, अगं सानिका आपण धबधब्याखाली नको उतरूया. पाणी किती उंचावरून आणि किती वेगाने पडते आहे बघ! अशा पाण्यात आपल्याला धोका होऊ शकतो. आई-बाबांनी सांगितलंय पाण्यापासून सावध राहा.” आई-बाबांचे नाव काढताच सचिन जोरात हसला आणि म्हणाला, “अभय आता तू शाळेतलं कुकुलं बाळ नाहीस. कॉलेजमधला तरुण आहेस. अरे असं घाबरतोस काय!” अभयला सारे हसले. पण अभय गप्प बसला. मग सचिन, सुजय, अनिल असे चार-पाच जण धबधब्यात उतरले. मुली आणि अभय मात्र बाहेरच पावसाची मजा घेत राहिले.


अर्धा तास झाला असेल, नसेल. सचिनला काय वाटले कुणास ठाऊक! पण तो धबधब्याच्या वरच्या बाजूला जाऊ लागला. अभय आणि त्याच्या सोबतच्या मुलींनी “सचिन वर चढू नकोस” असे ओरडून सांगितले. पण माझा फोटो काढा तुम्ही लांबून, भित्रे कुठले!” असे म्हणत सचिन वर चढू लागला. पावसाच्या पाण्याने दगड निसरडे झाले होते. त्यातून तो कसाबसा वर चढू लागला. धबधब्याच्या वरच्या बाजूला उभा राहून दोन्ही हात वर करून फोटोची पोझ देऊ लागला. तितक्यात नको ते घडले. सचिनचा पाय घसरला आणि तो वीस फूट खाली पाण्यात पडला. सगळ्यांनी आरडाओरडा केला. पडला पडला पडला! अभय चटकन पुढे धावला पण पाण्याचा जोर जास्तच होता. सचिन वरून पाण्यात पडला पण नेमका एक दगड त्याच्या कपाळाला लागला. तिथे असणाऱ्या मुलांनी त्याला लगेच बाहेर काढले. कपाळाला मोठी जखम झाली होती. तेथून रक्ताची धार लागली होती. शिवाय पायाचे हाडही मोडले होते. सचिनची शुद्धदेखील हरपली होती.


सगळ्यांच्या काळजात चर्र झालं. सगळ्यांच्याच आनंदावर विरजन पडलं. सचिनचं वेडं धाडस अंगलट आलं होतं. लगेच जवळच असलेल्या एका दयाळू व्यक्तीने सचिनला त्याच्या गाडीत घेतलं. सोबत अभय, कोमल, तनिष्का आणि विजय निघाले. मुरबाड येथील रुग्णालयात एका तासात पोहोचले. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. दोन तासांनंतर सचिन शुद्धीवर आला. अभयचा हात हातात घेत म्हणाला, “अभय मला माफ कर. मी तुला हसलो, तुला बालिश, शाळकरी म्हणालो. तू मला संभाव्य धोक्याची सूचना देत होतास. तेव्हा मी तुझे ऐकले नाही आणि संकटात सापडलो. अभयला आपल्या आईच्या वाक्याची आठवण झाली. “स्वतःबरोबरच तुझ्या मित्रांचीदेखील काळजी घे अभय”, “आई मला माफ कर...” अभय स्वतःशीच पुटपुटला.

Comments
Add Comment