Saturday, August 2, 2025

मी आई-बाबांच्या रागाचं कारण?

मी आई-बाबांच्या रागाचं कारण?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू


आपले आई-वडील बहुधा झोपले असावेत आतापर्यंत असा समज झाल्याने दोन भावंडं मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. अर्थातच आई अलीकडे खूप चिडचिड करते. बाबा नेहमी दमलेला आणि वैतागलेला असतो हा त्या दोघा भाऊ-बहिणीच्या बोलण्याचा विषय होता. “आई आणि बाबाच्या चिडण्याचं नक्कीच काही कारण असेल नाही का?” ती म्हणाली.


“खरंय तुझं म्हणणं. उगाच कारणाशिवाय कोणी चिडत नाही. आई घरातलं काम करण्यात दिवसभर थकते अन् म्हणून ती आपल्या प्रत्येक गोष्टींवर चिडते असं मला वाटतं” तो म्हणाला.


ती म्हणाली, “मला वाटतं बाबा पण दिवसभर ऑफिसमध्ये, मग ट्रॅफिकमधून प्रवास करून घरी येतो म्हणूनच त्याचा मूडच नसतो.”


थोडा विचार करून मग तो म्हणाला, “पण मला आजकाल असं वाटतं, की आपल्या दोघांमुळे बहुतेक ते चिडत असावेत. आपण तर त्यांच्या रागाचं कारण ठरत नाही आहोत ना?” पालकांनो आपली ही खंत जर मुलांना दिसत असेल, की आपले आई-वडील आपल्यामुळे चिडत आहेत, तर मुलांची स्वप्रतिमा, स्वप्रतिष्ठा खालावत जाते. राग, संताप, चिडचिड, वैताग, असमाधान, दुःख या गोष्टी मुलांच्या मनाला विस्कटून टाकतात, सैरभैर करतात. खरं सांगू का तुम्ही वाईट नसता पालकांनो, पण जर तुमच्या मुलांना असं वाटत असेल की


तो / ती तुमच्या रागाचे कारण आहेत, तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही. याबाबत आपण जागरूक होणे आवश्यक आहे. कारण इथूनच खरी सुरुवात होणार आहे आपल्यातील पालकत्व शैलीतील बदलाची.


ही गोष्ट नेमकी काय नुकसान करते मुलांचे, तर त्यांना हे दुःख सतत टोचत राहतं की आपल्यात काहीतरी कमी आहे, आपण आपल्या पालकांना आनंदी, समाधानी ठेवू शकत नाही, त्यांना आपलं कौतुक वाटावं, अभिमान वाटावा असं आपण वागत नाही आणि मग या भावनेने मुले दुःखी होतात. वरती सांगितलेल्या प्रसंगातील भावंडांनी मग एक खेळ खेळायला सुरुवात केला. ज्यामध्ये आई-बाबांच्या भावना ओळखणं आणि त्या समजून घेणं, तपासून पाहणं या प्रक्रियेतून मुलांचं मन जात होतं.


काय केलं की आई आनंदी होईल? बहीण म्हणाली


भाऊ म्हणाला, “आईला कामात मदत केली की.”


आईला ते ऐकू गेलं. तिने स्मितहास्य केलं, पण मन जणू पाण्यात हेलकावे खाऊ लागलं. तिला वाटलं मुलगा म्हणेल मी आईला कॉमेडी करून हसवलं, मागून येऊन तिचे डोळे झाकले तर तिचा मूड छान होईल.


मग ती म्हणाली, “कोणत्या गोष्टींमुळे आई दुःखी होते?”


“जेव्हा आपण वस्तू जागेवर ठेवत नाही.”


तो म्हणाला, आई कोणत्या गोष्टींमुळे उत्साही होते?


“मी सांगतो शॉपिंगला जायचं असतं आणि आजीकडे जायचं असलं की ती खूप उत्साही असते आणि ट्रेकिंगला जायचं ठरलं, फुटबॉलची मॅच असली की बाबा एक्साईटेड होतो.”


बहीण म्हणाली, “कोणत्या गोष्टींमुळे आईला राग येतो बाबा वैतागतात?”


आता दोघंही गप्प होते. बराच वेळ शांतता पसरली.
मग तो हळूच म्हणाला, ‘मी’


तो असं म्हणाला नाही की मी जेव्हा आरडाओरडा करतो किंवा मी जेव्हा वस्तू तोडतो किंवा मी पसारा करून ठेवतो तेव्हा.


असं काही न म्हणता तो फक्त म्हणाला ‘मी’.


आणि आईला लगेच लक्षात आलं मुलगा असं का म्हणाला तर कालच मी त्याला रागावले, त्याच्यावर ओरडले तुझ्या शाळेतून तक्रार येते की, तू सारखी बडबड करत असतोस, मस्ती करत असतोस. मला ते ऐकून लाज वाटली तुझी.


काय झालंय तुला? तू कधीच ऐकत नाहीस, दुर्लक्ष करतोस. जणू काही मी सांगतेय ते महत्त्वाचंच नाही तुझ्यासाठी. हे बोलताना माझा आवाज खूप चढला होता. शब्द धारदार झाले होते. तो राग व्यक्त करताना मी माझा आवाज, माझे शब्द, माझ्या भावना फिल्टर करू शकले नाही. मी हा विचार केला नाही की मला त्याचा राग आला होता की त्याच्या वागण्याचा? तू कसा आहेस यापेक्षा तुझ्याकडून काय वागणं अपेक्षित आहे हे बहुतेक मी बोलायला हवं होतं का? हे विचार आई आणि बाबांच्या डोक्यात आले आणि ते स्तब्ध होऊन बसले. ‘मी’ हा शब्द जणू चक्रवातासारखा गोल गोल फिरत होता. त्याचा प्रतिध्वनी कानावर सारखा आदळत होता.


ही माझी मुलं खरं म्हणजे माझ्या शरीराचा एक भाग बनून जन्माला आली. आमच्या दोघांच्या एकरूप होण्यातून आली.
आई बाबांना म्हणाली की, मला माझं बालपण आठवतं. घरातल्या मोठ्या माणसांच्या धाकात वाढत होते.”


“मी पण नेहमी अलर्ट मोडवरच असायचो बाबा म्हणाले. माझ्या गोंधळात आरडाओरडा नको व्हायला जास्त, मस्ती अति नको व्हायला, कोणतीच गोष्ट जास्त होऊ नये म्हणून मी खरं म्हणजे घाबरून राहायचो. कारण ते मला जेव्हा रागवायचे तेव्हा माझंच चुकलंय असं मला वाटत राहायचं आणि मला माझ्या मुलांनी सतत असं भीतीखाली राहावं असं खरंच आवडणार नाही.”


आई बाबांना म्हणाली, ‘‘आपण मुलांच्या चांगल्यासाठी बोलतो, रागावतो, चांगल्या सवयी लावाव्यात म्हणून ओरडतो पण त्याचा असाही परिणाम होतोय, की मुलं स्वतःला दोषी ठरवताहेत.


मला वाटतं, आपलं रागावणं त्यांना ते कसं वागताहेत, काय करताहेत याचा विचार करायला शिकवत नाही. उलट लपवायला शिकवतं. स्वतःला दोषी ठरवायला आणि आपल्यामुळे आई-बाबांना राग येतो असं वाटायला लावतं. त्यांची किमतच या जगात काही नाही असं वाटायला जर आपलं रागावणं हे शिकवत असेल, तर मग मुलांच्या मनस्वास्थ्याला ते धोकादायक आहे. पण मग असंही वाटतं की चुका दाखवायच्याच नाहीत का?”


बाबा म्हणाले, ‘‘चुकांबाबत बोलताना ठामपणे सांगायचं. मात्र मुलांना वैयक्तिक नावं न ठेवता त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त करायची, एवढं आपण नक्कीच करू शकतो. मुलांना एवढं कळू देऊ या की हे तुमच्या प्रेमापोटीच चाललंय. त्यांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. ही सजगता, हा बदल पालकत्वात आणू या पालकांनो.

Comments
Add Comment