Saturday, August 2, 2025

व्हिज्युअल डबिंगमध्ये एआयची चमक

व्हिज्युअल डबिंगमध्ये एआयची चमक

डॉ. दीपक शिकारपूर


ऑटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे बनत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा अॅनालिसिस, रोबोटिक्स या आणि यासारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत यात शंका नाही. इंडस्ट्री ४.०, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डेटा अनॅलिटीक्स हे उद्याच्या तंत्रजीवन पद्धतीचे अविभाज्य घटक असतील. व्यक्तिगत तर सोडाच; परंतु औद्योगिक, सामाजिक आणि सार्वजनिक पातळीवर संगणकाच्या या विविध अवतारांचे अत्यंत क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम होतील. अनेक पारंपरिक संकल्पना मोडीत निघून नव्या पद्धती चटकन रुळतील. आज संगणकीय सूक्ष्म तंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल, किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू इतक्या सहज हा बदल होणार आहे. याला ‘इंटेलिजंट कॉप्युटिंग’असे म्हटले जाते. या क्षेत्रातील सतत बदलणारे तंत्रज्ञान पाहू्न आपल्या जगण्याची कल्पनाच बदलते. बदलांचा हा वेग येत्या पाच-दहा वर्षांमध्ये अधिक वाढणार आहे. तो अधिक सर्वव्यापी होईलच, पण ज्या पैलूंमध्ये बदल दिसण्याची आपण कल्पनाही केली नव्हती अशा ठिकाणी तो आढळेल


आगीचा वापर किंवा चाकाच्या शोधापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा शोध टप्पा ठरू शकतो. हे जगात आतापर्यंतचे सर्वात वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. यामध्ये भाषा मॉडेल्स आणि सॉफ्टवेअर एजंट्सद्वारे अनेक व्हाईट-कॉलर नोकऱ्या पूर्णपणे संपवण्याची क्षमता आहे. तसेच बुद्धिमान ह्युमनॉइड रोबोट्सच्या वाढत्या पिढीद्वारे अनेक ब्ल्यू-कॉलर नोकऱ्याही संपू शकतात. हा असा पहिला शोध आहे, जो जवळजवळ प्रत्येक प्रकारे मानवापेक्षा श्रेष्ठ असण्याची धमकी देतो. कदाचित आपण विचार केला त्यापेक्षा लवकर. स्टिफन हॉकिंग्ज यांनी हा इशारा अनेक वर्षांपूर्वी दिला होता. आतापर्यंत शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींमध्ये या तंत्राचा वापर झाला होता. मात्र कलाक्षेत्र यापासून दूर कसे राहील? चित्रपट एका भाषेत बनवला जातो. तो जगभरातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो, तेव्हा डबिंगचा उपयोग केला जातो. यामुळे प्रेक्षकांना चित्रपट त्यांच्या स्वतःच्या भाषेत समजण्यास मदत होते आणि ते कथेला अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातात. डबिंगमुळे चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग अनेक पटींनी वाढतो. प्रेक्षकांना उपशीर्षके (सबटायटलस) वाचण्याऐवजी डब केलेला चित्रपट पाहणे अधिक सोयीचे आणि आरामदायक वाटते. विशेषत:, लहान मुले किंवा वाचायला त्रास होणाऱ्यांसाठी डबिंग अधिक उपयुक्त ठरते. एकाच चित्रपटाच्या आवृत्त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार केल्याने तो प्रादेशिक बाजारपेठेत यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट पुन्हा शूट करण्यापेक्षा डबिंग करणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे ठरते. यामुळे निर्मात्यांना कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. आपण हे दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल पाहिले आहे. आता अनेक चित्रपट एकाच दिवशी अनेक भाषेत प्रदर्शित केले जातात.


आज डबिंगमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे. एआय-आधारित सॉफ्टवेअर मूळ संवादांचे जलद आणि अचूक भाषांतर करू शकते. एआय आता मानवासारखे नैसर्गिक आवाज तयार करू शकते. हे आवाज मूळ कलाकारांच्या आवाजाच्या टोन, लय आणि भावनांशी जुळवण्याचा प्रयत्न करतात. ‘टेक्स्ट-टू-स्पीच’ तंत्रज्ञानाचा वापर करून भाषांतरित मजकूर स्वयंचलितपणे आवाजात रूपांतरित केला जातो. एआय अल्गोरिदम व्हिडीओतील पात्रांच्या ओठांच्या हालचालींचे विश्लेषण करून तयार केलेला आवाज त्यांच्याशी जुळवण्याचा प्रयत्न करतात. एआय तंत्रज्ञान मूळ कलाकाराच्या आवाजाची नक्कल करू शकते. यामुळे डब केलेल्या संवादातही मूळ कलाकाराचाच आवाज असल्याचा अनुभव येतो. मूळ कलाकार डबिंगसाठी उपलब्ध नसतात किंवा त्यांचे निधन झालेले असते, अशा वेळी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. काही प्रगत प्रणाली, तर व्हिज्युअल माहितीचा वापर करून अधिक नैसर्गिक लिप-सिंक तयार करू शकतात. यामुळे डब केलेला भाग मूळ भागासारखाच दिसतो. इथे एक उदाहरण देता येते. ‘वॉच द स्काय’ हा स्वीडिश चित्रपट व्हिज्युअल डबिंग नावाच्या तंत्राचा वापर करून कलाकारांच्या ओठांच्या हालचालींमध्ये बदल करत असून एकही दृश्य पुन्हा शूट न करता आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी डब केलेल्या इंग्रजी संवादांनुसार मॅप करत आहे.


लॉस एंजेलिस येथील ‘फ्लॉलेस’ ही चित्रपटनिर्माती एआय फर्म आणि त्यांच्या ट्रूसिंक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. ते अभिनेत्याच्या संपूर्ण कामगिरीचे विश्लेषण करते, त्यांच्या चेहऱ्याचे व्हॉल्यूमेट्रिक ३ प्रतिनिधित्व तयार करण्यासाठी डीप लर्निंगचा वापर करते आणि नंतर पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये फुटेजमध्ये त्यांच्या तोंडाच्या हालचाली अनुकूल करते. डबिंगच्या क्षेत्रात एआय एक शक्तिशाली साधन म्हणून उदयाला आले आहे. यामुळे भाषांतर, आवाज संश्लेषण आणि लिप-सिंकसारख्या प्रक्रियांमध्ये सुधारणा झाली आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे. तथापि, भावनात्मक बारकावे आणि सांस्कृतिक संवेदनशीलता यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये अजूनही मानवी हस्तक्षेपाची गरज भासते. त्यामुळे भविष्यात एआय आणि मानवी सहकार्याने डबिंगची प्रक्रिया अधिक परिपूर्ण होईल यात शंका नाही. एआयमुळे व्हीएफएक्स आणि डबिंगमध्ये अनेक फायदे असले तरी काही आव्हानेदेखील आहेत. एआयमुळे काही कामे स्वयंचलित होत असल्याने कलाकारांच्या आणि डबिंग कलाकारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होण्याची भीती आहे. तथापि, अनेक तज्ज्ञांचे मत आहे की एआय मानवी सर्जनशीलतेची जागा घेणार नाही, तर एक शक्तीशाली साधन म्हणून काम करेल. यामुळे कलाकार अधिक सर्जनशील कामांवर लक्ष केंद्रित करू शकतील. या पार्श्वभूमीवर डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर, सिंथेटिक आवाजांची संमती आणि सांस्कृतिक गैरसमज यासारख्या नैतिक मुद्द्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. पूर्णपणे एआय-आधारित डबिंगमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक बारकावे गमावले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या कामी मानवी देखरेख आवश्यक आहे. एकंदरीत, डबिंग उद्योगासाठी एआय गेम-चेंजर ठरले आहे. यामुळे निर्मिती प्रक्रिया अधिक कार्यक्षम, जलद आणि परवडणारी होत आहे. यामुळे मनोरंजन उद्योगात नवनवीन शक्यता निर्माण होत आहेत. भविष्यात, मानवी सर्जनशीलता आणि एआय तंत्रज्ञानाचे सहकार्य या क्षेत्रांना अधिक उंचीवर घेऊन जाईल.


प्रेक्षकांना उपशीर्षके वाचण्याऐवजी डब केलेला चित्रपट पाहणे अधिक सोयीचे वाटते. लहान मुले किंवा नीट वाचू न शकणाऱ्यांसाठी डबिंग जास्त उपयुक्त ठरते. एकाच चित्रपटाच्या आवृत्त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार केल्याने तो प्रादेशिक बाजारपेठेत यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट पुन्हा शूट करण्यापेक्षा डबिंग करणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे ठरते. एआय तंत्रज्ञान या क्षेत्रात घडवत असलेल्या चमत्काराचा मागोवा.

Comments
Add Comment