मुंबई : राजस्थानमध्ये सरकारी शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी प्रार्थनेवेळी घडली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने पावले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेश भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहेत.
राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.