
मुंबई : मुंबई शहराला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या परळ टी टी उड्डाणपुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका नवे कंत्राट देणार आहे. पुलावरील दोन मार्गिकांचे काम टप्प्याटप्प्यात केले जाणार आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी या पुलावर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. परळ टी टी उड्डाणपुलाच्या मजबुतीकरणासाठी १३ कोटी ८२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी कंत्राटदाराचीही निवड झाली आहे.
वाहनचालकांना दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, भायखळा, लालबागनंतर परळ टीटी उड्डाणपुलामार्गे, दादर टीटी, माटुंगा, सायनपासून पुढे पूर्व उपनगरांत जाता येते. यामुळे परळ टी टी उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. या उड्डाणपुलाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
परळ टी टी उड्डाणपुलावर काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहनचालकांना अडथळा येत होता. अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे महापालिकेने ऑक्टोबर २०२३मध्ये पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. पण आता पुलाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. पुलावरील पृष्ठभागासह अन्य भागात डांबर काढून काँक्रिटचा थर दिला जाणार आहे. पुलावर सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करुन १० वर आणले जातील.