भालचंद्र कुबल : पाचवा वेद
मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो होता आणि मजकूर होता, ‘आप फिल्मे क्यों नही करतें? नाटकही क्यों करते हो?’ उत्तर होते, ‘मैं नाटक इसलिए करता हूं क्योंकी, फिल्ममें तुम्हारा हिरो आसमान की तरफ इशारा करता है और कहता है, वो रहा चाँद, और फिर कॅमेरा उस तरफ घुमता है, और थिएटरमें बैठे हजारो लोगोंको सुंदर चाँद नजर आता है। मेरे नाटकमें, मेरा हिरो पिछे परदे की तरफ इशारा करते हुए कहता है, “वो रहा चाँद, लोगोंकी नजर उसके इशारे की तरफ जाती है, पर परदेपर कुछ नही होता, फिर भी थिएटरमें बैठे हजारो लोगोंको चाँद नजर आता है । उनके मनमें छुपा हुआ “मैं उनके मनका चाँद दिखाने के लिए नाटक करता हूं”

किती गहन आणि प्रचंड व्याप्ती असलेली नाटकाची व्याख्या रतन थिय्याम यांनी करून ठेवली होती. २३ जुलैला त्यांनी जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली आणि कधीही न भेटलेले थिय्यामसाहेब आठवले. प्रकर्षाने आठवली ती ‘थिएटर ऑफ रुट्स’ नावाची त्यांची नाट्य चळवळ. १९७०चे दशक महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीचा जसा सुवर्णकाळ मानला जातो, तसाच तो मणिपूरसारख्या भारताच्या कुठल्याशा दुर्लक्षित नाट्यक्षेत्राकडे लक्ष वेधून घेणारा आरंभकाळ ठरला. १९७६ मध्ये त्यांनी इम्फाळमधे कोरस रेपर्टरी स्थापन करून नाट्य चळवळीचा पाया रचला आणि मग रतनयुग सुरू व्हायला वेळ लागला नाही. एखाद्या दुर्गम भागात, पोटापाण्याची भ्रांत असलेल्या प्रदेशात मनोरंजनाधिष्ठीत अर्थकारण उभारण्यात अनेक समस्या येत असतात. त्या सर्व मोडीत काढून अखिल भारतीय रंगकर्मींचे लक्ष वेधून मणिपूरसारख्या राज्यात काहीतरी वेगळे घडते आहे, याची जाणीव रतन थिय्याम यांच्या चळवळीने करून दिली. १९७४ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील आपले शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक करिअरच्या मागे न लागता त्यांनी थेट इम्फाळ गाठले. आधुनिक राजकारण व सामाजिक कल्याण यांचा वैचारिक गोंधळ चालला असताना त्यांच्या कलाकृती आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाबाबत केलेले सखोल चिंतन नाट्यअभ्यासातील माईलस्टोन ठरले. त्यांची नाटके अनेक तर्कसंगत आणि आध्यात्मिक विश्लेषण यांच्या अानुषंगाने मांडणी केलेली असत. कल्पक नाट्यमय रंगमंच वापरून त्यांची नाटके, साहित्य व सौंदर्याने नटलेली आहेत. रतन थिय्याम यांच्या नाटकांच्या थीमॅटिक संरचना भारतीय आहेत आणि ती सर्वसामान्यांना आकर्षित करणारी सखोल नाटके आहेत. भरतमुनी प्रणित नाट्यशास्त्राचा, ग्रीक थिएटरचा तसेच नोह रंगभूमीचा त्यांच्यावर भारी पगडा होता. थांगता या मणिपुरी मार्शल आर्टचा कलात्मक वापर नाटकांमधे पारंपरिक पद्धतीने करून एक आगळा-वेगळा प्रायोगिक नाट्यप्रकाराला त्यानी जन्म दिला. रतन थिय्यामाने उरुभंगम, अंधायुग, अँटीगॉन, उत्तर प्रियदर्शी यासारखे पिरीयड-प्ले सद्य कालानुसार रुपांतरित करून आपल्या नाट्य चळवळीला नवा आयाम दिला. त्यानी सादर केलेले ऋतुसंहार तर आजच्या जगातील अराजकता आणि हिंसाचारात सांत्वन आणि विवेक शोधते. तसेच अंधायुग तर हिरोशिमा नागासाकीवरील हल्ला अधोरेखित करत माणूसकी आणि जिव्हाळा शोधत राहते. त्यांची लक्षवेधी ठरलेल्या नाटकात करणभरम् (१९७९) नाटककार भास, इम्फाळ इम्फाळ (१९८२), चक्रव्युह(१९८४), लेंगशोनेई (१९८६), उत्तर प्रियदर्शी (१९९६), ऋतुसंहारम्, अंधायुग, आशिबागी येशेई, लायरेम्बिगी एशेई, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘राजा’ या नाटकावर आधारित ‘द किंग ऑफ डार्क चेंबर’ (राजा, २०१२) या नाटकांचा समावेश होतो.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, भरतमुनी सन्मान पुरस्कार, कालिदास सन्मान आदी महत्त्वाच्या दहा पुरस्कारांनी त्याना सन्मानित केले गेले. रतन थिय्याम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक, तसंच, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. केंद्र सरकारने त्यांच्या रंगभूमीवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना १९८९मध्ये पद्मश्री सन्मान प्रदान केला होता.
चित्रकार, दिग्दर्शक आणि रंगमंचाला दिवाणखान्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ्या थिएटर ऑफ रूट्स नाट्य चळवळीचे जनक म्हणून थिय्याम यांची ओळख होती. थिय्याम यांच्या निधनामुळे भारतीय नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ हरपला आहे. आपल्या प्रदीर्घ नाट्यसेवेत व वयाच्या ७७व्या वर्षांपर्यंत नाटक जगलेला हा अदभूत अवलिया होता. नव्याने बदलत जाणाऱ्या रंगभूमीवरील पाश्चात्य प्रभाव कमी करणाऱ्या थिय्याम यांच्या निधनामुळे भारतीय नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ हरपला आहे.