
मुंबई : मंत्रालयात १ ऑगस्टपासून ऑफलाईन प्रवेश बंद होईल आणि डिजिटल प्रवेश व्यवस्था सुरू होणार आहे. या संदर्भातील सूचना मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांनाही ही सूचना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील प्रवेशासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस रेकग्नायझेशन’ प्रणालीला सुरुवात केली होती. या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना प्रवेशासाठी नवी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आता मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही नवी ऑनलाइन प्रक्रिया या वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आली आहे. आता डिजिप्रवेश ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातूनच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे.
डिजिप्रवेश ही आधार क्रमांकांशी जोडलेली ऑनलाईन प्रणाली आहे. यात कोणत्या विभागात जायचे आहे आणि कोणाला भेटायचे आहे याची माहिती नोंदवली जाते. चेहरा पडताळणी केली जाते. नंतर मंत्रालयात प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार आहे.