Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मुंबई ते बडोदरा महामार्गाला लामज, सुपेगावाशी जोडणार

मुंबई ते बडोदरा महामार्गाला लामज, सुपेगावाशी जोडणार

१६० कोटींचा निधी मंजूर; कामाला लवकरच सुरुवात

वाडा: केंद्रशासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेला मुंबई-बडोदरा महामार्ग भिवंडी-वाडा रस्त्यामधून जातो. भिवंडीतील लामज-सुपेगाव येथे या महामार्गाला जोड देण्याची मागणी भिवंडी लोकसभेचे खा. सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

खा. म्हात्रे यांच्या मागणीची दखल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली असून या जोडणी प्रकल्पासाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात म्हात्रे यांनी नुकतीच मंत्री गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

या महामार्गावरून मुंबई-बडोदरा महामार्ग जाऊनही या मार्गावर थेट प्रवेश नसल्याने प्रवाशांना वाहतूक वळसा घालून तब्बल १८ किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे, यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होते. स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

त्यामुळे भिवंडी-वाडा मार्गावर लामज, सुपेगाव गावाजवळून मुंबई-बडोदरा महामार्गावर थेट प्रवेशद्वार निर्माण करावे, रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व दुरुस्ती करून अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करावी. नवीन इंटरचेंज तयार करून भिवंडी-वाडा मार्ग थेट एक्स्प्रेसवेने जोडावा, यामुळे वाहतूक वेगवान होईल आणि स्थानिकांसाठी सहज उपलब्धता निर्माण होणार असून त्यामुळे भिवंडी-वाडा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होऊन ५ हजारांहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिक तरुण आणि कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

येथील नागरिक, शेतकरी व प्रवाशांसह भिवंडीच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्वाचा दुवा ठरणार असून या प्रकल्पामुळे परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याने आपण या प्रकल्पासाठी यापूर्वीही मंत्री गडकरी यांची भेट घेतली असून नुकताच झालेल्या भेटीत या जोडणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा