मोदीयुग

हिंदू पुराणांत चार युगांची कल्पना सांगितली आहे. चार युगांच्या चक्राकार गतीने विश्व बांधलेलं आहे, असं त्यात म्हटलं आहे. ते कितपत खरं माहीत नाही, पण गेल्या अकरा वर्षांपासून भारतात ‘मोदीयुग’ सुरू आहे, याबाबत कोणाचंच दुमत असणार नाही. अगदी विरोधकांचंसुद्धा. कारण, २०१४ पासून आतापर्यंत तीन सार्वत्रिक निवडणुका झाल्या, राज्यांमध्ये विधानसभेच्या तेवढ्याच निवडणुका झाल्या, त्या प्रत्येक निवडणुकीत ‘मोदी फॅक्टर’च निर्विवाद ठरला आहे. या ‘फॅक्टर’च्या बळावरच भारतीय जनता पक्षाने जिथे तिथे आपली विजयरेखा कोरली आहे. राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांत पक्षाला काही ठिकाणी कमी यश मिळालं. पण, त्या परिस्थितीतही नुकसान कमीत कमी करणारा ‘मोदी फॅक्टर’ होताच. ते नसतं, तर कदाचित तिथे पक्षाला आणखी नुकसान सोसावं लागलं असतं. भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा वारू गेल्या दहा-बारा वर्षांत चौखुर उधळला आहे, हे खरंच आहे. पण, त्याचं कारण त्या वारूचा लगाम मोदींच्या हातात आहे, हे त्याहून खरं आहे. मोदींचा करिष्माच अजब आहे. साधे आमदारही नसताना ते थेट गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जनतेने स्वीकारल्यानंतर खासदार झाले! त्यांच्या मार्गात कमी अडथळे आले नाहीत. चहुबाजूने वाटेत काटे पेरण्याचे प्रयत्न झाले. पण, साहस आणि अचल वृत्तीने त्यांनी आपली मार्गक्रमणा सुरूच ठेवली. हे शतकच जणू मोदींसाठी उजाडलं आहे. शतकाच्या प्रारंभी, २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. १४ वर्षे सलग मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर, ‘गुजरात मॉडेल’च्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द सुरू झाली. वयाच्या पन्नाशीनंतर सरकारमध्ये आलेल्या मोदींनी ‘गुजरातचे मुख्यमंत्री ते विश्वगुरू’ ही गेल्या २५ वर्षांत केलेली वाटचाल जगातील भल्याभल्यांना कोड्यात टाकते आहे. हे ‘मोदीयुग’ यापुढेही अखंड राहावे, हीच भारतातल्या सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे.


काल, २५ जुलै २०२५ रोजी मोदींनी आपले पंतप्रधान पदावरील सलग ४ हजार ७८ दिवस पूर्ण केले. १९६६ ते १९७७ दरम्यानचा माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी यांचा सलग कार्यकाळ चार हजार ७७ दिवसांचा होता. म्हणजे, मोदी आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर भारताचे सर्वाधिक काळ सलग राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत! मोदींसह आतापर्यंत १५ जणांनी भारताचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. त्यात अखंड कारकिर्दीने या १५ जणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेणं ही सोपी गोष्ट नाही. स्वातंत्र्यानंतर देशाच्या कारभाराची सूत्रं दीर्घकाळ काँग्रेसकडे राहिली. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीने जनता पक्षाच्या रूपाने देशाला पहिलं बिगर कॉँग्रेसी सरकार दिलं. पण, मतदारांनी दिलेला पाच वर्षांचा कार्यकाळही ते पूर्ण करू शकलं नाही. पूर्वाश्रमीचा जनसंघ जनता पक्षाच्या त्या प्रयोगात होता. समाजवादी नेते मधु लिमये यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जनता पक्षातील पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांमधील जरी इतकी रुंदावली, की त्यातून सरकार तर कोसळलंच; पण जनता पक्षही संपला. पूर्वाश्रमीच्या जनसंघियांनी ‘भारतीय जनता पक्ष’ नांवाने आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली. अवघ्या दोन खासदारांपासून पक्षाच्या त्या काळातील धुरिणांनी हिम्मत न हरता आपली मार्गक्रमणा सुरू ठेवली. १९९६ आणि १९९८ अशी दोनदा देशात सरकार स्थापन करण्याची संधी त्या पक्षाला मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन्ही वेळा सरकारचं नेतृत्व केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या, देशात सर्वमान्य असलेल्या वाजपेयींनी आपली आणि आपल्या सरकारची स्वतंत्र प्रतिमा जपली. पण, मोदींच्या तुलनेत वाजपेयी मुळातच सौम्य प्रकृतीचे नेते होते. १४ वर्षांचा प्रशासनाचा जो दीर्घ अनुभव मोदींकडे होता, तो वाजपेयींकडे नव्हता. मोदी यांनी पंतप्रधान होताच संपूर्ण राजकीय, प्रशासकीय घडी बदलली. धडाकेबाज निर्णय घेतले. काँग्रेसची छाप पुसून टाकण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला. अन्य विरोधी पक्षांनाही हतबल करून टाकलं. त्यामुळे, संपूर्ण देशात भाजप आणि मोदींचाच एकछत्री अंमल असल्याचं चित्र निर्माण झालं. जगभर मोदींचे चाहते तयार झाले. आपल्या चाहत्यांत केवळ सर्वसामान्यच नाहीत, सर्वशक्तिमान देशांचे राष्ट्रप्रमुखही आहेत, हे मोदींनी जगाला दाखवून दिलं.


खंडित काळ गृहीत धरला, तर इंदिरा गांधी यांची एकूण कारकीर्द मोदींपेक्षा जास्त आहे. नेहरूंची त्यापेक्षाही मोठी आहे. पण, स्वातंत्र्यानंतर जन्मलेले मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. कोणत्याही बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपेक्षा मोदींची कारकीर्द मोठी आहे. उत्तरेतल्या हिंदी भाषिक पट्ट्याबाहेरचे; गुजरातचे ते दीर्घकाळ राहिलेले आता एकमेव पंतप्रधान आहेत. ज्यांनी मुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधानपद अशी दोन्ही पदं भूषवली, असेही ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले नेते ठरले आहेत. लोकसभेचे दोन कार्यकाल पूर्ण केलेले तर ते एकमेव काँग्रेसेतर पंतप्रधान आहेत. लोकसभेची निवडणूक दोनदा सलग निवडून जिंकलेलेही ते पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. लोकसभेच्या सलग तीन निवडणुका जिंकलेले, पंडित नेहरूंनंतर केवळ मोदी हेच पंतप्रधान आहेत. २०२२ पासून सलग सहा निवडणुका ते अजिंक्य आहेत. त्यातल्या तीन विधानसभेच्या, तर तीन लोकसभेच्या निवडणुका आहेत. नव्या रचनेत आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रत्येक घडामोड राष्ट्रीय राजकारणावर, अर्थकारणावर आणि स्थैर्यावर परिणाम करत असते. त्या अर्थाने बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये देशाची प्रगतीची घोडदौड कायम राखणं ही सोपी गोष्ट नाही. आंतरराष्ट्रीय दबावांना न जुमानता देशहिताचं आर्थिक, औद्योगिक, व्यापारी धोरण आखणं आणि त्यातून देशहित साधणं ही तर त्यापेक्षाही अवघड कसोटी आहे. सीमेवरील शेजारी सर्व देशांत उद्रेक आणि असंतोष असूनही देशांतर्गत शांतता कायम राखण्यासाठी उच्च प्रतीच्या प्रशासकीय कौशल्याची गरज आहे. हे कौशल्य, जनतेवरचा वादातीत प्रभाव, राजकारणावरची मजबूत पकड, सर्व यंत्रणावरचं विलक्षण नियंत्रण आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचा वावर - मोदींनी स्वतःला पूर्ण सिद्ध केलं आहे. आकड्यांची ही शर्यत त्यामानाने खूप छोटी गोष्ट वाटली, तरी त्या आकडेवारीतून दिसणारं सातत्य हे कोणत्याही लोकशाही देशातील नेत्यासाठी सर्वात मोठं प्रशस्तिपत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा हा तर केवळ एक टप्पा आहे!

Comments
Add Comment

सरन्यायाधीशांचा फटाका!

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं

कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही

विरोधकांचा भ्रमनिरास...

देशाच्या घटनात्मक संरचनेतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन सर्वोच्चपदे एक विशेष धाग्याने जोडलेली आहेत.

आणखी एका शेजाऱ्याच्या घरात...

शेजारच्या घरात आग लागते, त्याची धग आपल्यापर्यंत येते; त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी, असं म्हटलं जातं. देशाच्या

मणिपूरमध्ये मोदी

देशातील विरोधी पक्षांना एक खोड जडली आहे, ती म्हणजे कुठेही काहीही चांगले पाहायचे नाही. त्यानुसार देशभर बऱ्यापैकी

अमेरिकन टेनिसची नवी तारका

आर्यना सियारहिजेउना सबालेंका ही अमेरिकन ओपन टेनिसची यंदाची नवी तारका ठरली आहे. तिने नुकत्याच झालेल्या अंतिम