Saturday, October 25, 2025
Happy Diwali

महाराष्ट्रातील एक हजार शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये कारगिल विजय दिन साजरा

महाराष्ट्रातील एक हजार शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये कारगिल विजय दिन साजरा

भारताचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी १००० आयटीआयमध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

लोणावळा: भारताचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही महाराष्ट्रातील एक हजार शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये कारगिल विजय दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारक लहुजी साळवे ITI, लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी समाजसेविका मंजू लोढा देखील उपस्थित होत्या.

या उपक्रमामार्फत देशभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा आमचा उद्देश आहे. अनेक परकीय आक्रमणे आपल्या देशावर झाली पण त्याचा सामना करून आपण प्रगतीच्या वाटेवर पुढे जात आहोत. कारगिल विजय दिनाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. आज विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक सुद्धा येथे उपस्थित आहेत, याचा अतिशय आनंद आहे असे प्रसंगी बोलतांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

माजी सैनिक, सैन्यातील कार्यरत जवान यांचा सन्मान

कार्यक्रमात मुलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते, जिथे त्यांना देशसेवा, शिस्त आणि समर्पण यांची शिकवण देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष देशसेवकांशी संवाद साधत सैनिकांच्या अनुभवांची माहिती घेतली. यावेळी समाजसेविका मंजू लोढा यांनीही उपस्थित सैनिकांचे आभार मानत, आपल्या भावना व्यक्त केल्या. "आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभं राहू शकतो, यामागे तुमचं कर्तृत्व आहे. तुमच्याबद्दलचा आदर शब्दांत व्यक्त करता येत नाही," असं त्यांनी सैनिकांना उद्देशून सांगितलं. कार्यक्रमात माजी सैनिक, सैन्यातील कार्यरत जवान यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या सेवेसंबंधी आठवणी आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा