
तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला महिन्याला १५०० रुपयांचा लाभ
मुंबई: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास १४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांच्या खात्यात दर महिन्याला लाडकी बहिणीचे हफ्ते जमा होत होते. यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लाडकी बहीण योजनेवर सरकारला वर्षभरात ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातील जवळपास २१.४४ कोटी रुपये पुरुषांच्या खात्यात जमा झाले असल्याकारणामुळे, सरकारला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. मुख्यत्वेकरून ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु केली होती. मात्र, याचा फायदा लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या भावांनाच होत असल्याचे निदर्शनास आल्याने मोठा धक्काच बसला आहे.
त्याचप्रमाणे ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा देखील नियम आहे. कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ दिला जातो. असे असतानाही ६५ वर्षे वयावरील २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनास आले आहे. त्यांना १० महिन्यांपर्यंत ४३१ कोटी ७० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.आता हे लाभार्थी गाळले जाणार आहेत.
दहा महिने पुरुष योजनेचा लाभ घेत आहे
ऑगस्ट २०२४ पासून लाभार्थी महिलांना लाडकी बाहीने योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानुसार, ऑगस्ट ते जून असे १० महिने हफ्ते मिळाले असून, हे सर्व हफ्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात नसून तर लाडक्या भावाच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत डेट्याची पडताळणी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
पुरुष असूनही महिलांच्या नावाने पैसे घेतले
आणखी एक धक्कादायक म्हणजे, २ लाख ३६ हजार ०१४ लाभार्थी असे आहेत की, ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की, पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा. त्याची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४,२९८ पुरुष योजनेचा लाभ घेत होते, असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा १५०० रुपये मानधन बंद करण्यात आले आहे. पूर्णत: अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.