मुंबई: मराठी वर्षाच्या श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. श्रावण महिना म्हटला की प्रसन्न, हिरवेगार असे वातावरण सृष्टीमध्ये पाहायला मिळते. यावेळी सृष्टीचा चेहरा अधिकच टवटवीत आणि खुललेला दिसतो.
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे
असे या श्रावण महिन्याचे वर्णन कवितेत केले आहे. श्रावण महिन्यात सृष्टी हिरव्यागार रंगाने नटलेली असते. त्याचबरोबर हा श्रावण महिना म्हणजे व्रत-वैकल्यांचा आणि सणांचा महिना असतो. या महिन्यात सणांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.
श्रावण महिन्यात सर्वात आधी येणारा सण म्हणजे नागपंचमी. त्यानंतर रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गोपाळकाला असे सण येतात. यंदाच्या वर्षी २५ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. तसेच २३ ऑगस्टला श्रावण महिना संपेल.
श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला मंदिरांसह घरोघरी नागदेवतेची पूजा होणार असून लाह्या, फुटाणे, वटाणे, करंजीचा फुलोरा, हलव्याचा प्रसाद घरोघरी करून त्याचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान सुवासिनी श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रतही करतील. ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा तसेच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचे अतूट रेशमी बंध बांधून त्याला नेहमी रक्षण करत राहा, अशी गळ घालणार असून, या दिवशी बहिणी भावाच्या घरी किंवा भाऊ बहिणींच्या घरी जाऊन हातावर राखी बांधतील.
शुक्रवार १५ रोजी राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी साजरा होत असून याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरोघरी श्रीकृष्णाचा पाळणा, मूर्तीचे पूजन होणार आहे. शहरातील श्रीकृष्ण मंदिरांसह इस्कॉन मंदिरात याप्रसंगी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्या २२ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी जिल्ह्यात पोळ्याचा सण साजरा होणार आहे. पोळ्याला बैलजोड्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. पोळा या सणाला मराठी श्रावण महिन्याचा समारोप होत असतो. तान्हा पोळ्याला मातीसह लाकडी बैलांची पूजा केली जाणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण महिन्यात सण, उत्सव, व्रत, वैकल्ये केली जातात.
या महिन्यात श्रावण सोमवारला अधिक महत्त्व असते. या महिन्यात चार श्रावणी सोमवार येत आहेत. या दिवशी सोमवारच्या व्रताला अधिक महत्त्व असते.
असे आहेत श्रावणी सोमवार
पहिला श्रावणी सोमवार - २८ जुलै शिवामूठ : तांदूळ
दुसरा श्रावणी सोमवार - ४ ऑगस्ट शिवामूठ : तीळ
तिसरा श्रावणी सोमवार - ११ ऑगस्ट शिवामूठ : मूग
चौथा श्रावणी सोमवार - १८ ऑगस्ट शिवामूठ : जव