वाशीतील दोन प्रकल्पांसाठी महापालिकेचा हिरवा कंदील
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीत पहिल्या ‘क्लस्टर’ प्रकल्पांना परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. नवी मुंबईतील सिडकोने उभारलेल्या जेएन-१-२ प्रकारच्या चार वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत समूह विकास योजनेच्या मंजुरीसाठी आग्रह धरला होता. वाशीतील दोन नागरी पुनरुत्थान नकाशांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेस गती मिळाली असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यास हे दोन्ही प्रकल्प शहरातील पहिले ‘क्लस्टर’ प्रकल्प म्हणून ओळखले जातील.
नवी मुंबईतील सिडकोने उभारलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहेत. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (युडीसीपीआर) नागरी पुनरुत्थान योजनेसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या तसेच बेकायदा ठरलेल्या इमारतींनाही यामुळे समूह विकास योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोच्या आणि ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात लगतच्या रस्त्यांच्या आकारानुसार प्रकल्पांना किती प्रमाणात वाढीव चटईक्षेत्र दिले जाईल हे ठरते.
वाशी, कोपरखैरणे, नेरुळमध्ये महत्वाच्या जागेवर आणि रुंद रस्त्यांलगत असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुबलक चटईक्षेत्र मिळत असल्याने बहुसंख्य वसाहतींनी पुनर्विकास करण्याची भूमिका घेतली आहे. वाशी सेक्टर नऊ परिसरातील जे.
एन १-२ प्रकारात मोडणाऱ्या वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत यासंबंधीचा प्रस्ताव विकासकामार्फत महापालिकेस सादर केला होता. प्रस्तावातील नकाशे महापालिकेने जाहीर केले आहेत. ‘क्लस्टर’मार्फत मंजुरीसाठी हरकती, सूचना मागविल्या आहेत.