
कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांकडून टाळाटाळ
मुंबई : महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे. राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत राज्यांमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले. त्यामुळे कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता सरकार करेल, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केले. सरकारकडून कर्जमाफीचे ठाम आश्वासन मिळाले नसल्याने थकबाकी असलेला शेतकरी व पर्यायाने राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत.
थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. थकीत कर्जामुळे अनेक जिल्हा बँकांचे वसुलीचे प्रमाण घटले असल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राज्याच्या सहकार खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून २०२५ अखेर अल्प, मध्यम मुदतीचे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कृषीकर्ज थकले आहे.