
नवी दिल्ली: हवामान बदलाचे गंभीर परिणाम देशाच्या सुरक्षेवर व पायाभूत सुविधांवर दिसू लागले आहेत. हिमनद्या वितळत असून त्यातून तयार होणाऱ्या तलावांमुळे पूर येण्याचा धोका वाढला आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ६ राज्यांमधील १०० हून अधिक धरणांवर हिमनदी सरोवरांच्या विध्वंसक पुराचा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर धोक्याची दखल घेत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने तातडीने पावले उचलली असून, या धरणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. इतकेच नव्हे, तर या सरोवरांवर प्रत्यक्ष वेळेत नजर ठेवण्यासाठी संरक्षण दलांची मदत घेण्याचीही तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय जल आयोगाने जारी केलेली ही सूचना उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील धरणांना लागू करण्यात आली आहे.