Friday, August 15, 2025

'सरकार आमची मुलं परत आणू शकतं का?' पालकांचा आक्रोश

'सरकार आमची मुलं परत आणू शकतं का?' पालकांचा आक्रोश

झालावाड, राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातल्या पीपलोद गावात जे घडलं, त्याने संपूर्ण गाव हादरलं आहे. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा छप्पर कोसळला… आणि सात निरागस मुलांचं आयुष्य एका क्षणात संपलं. आणखी तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. त्यातील दहा जण मृत्यूशी झुंज देतायत. पण या साऱ्यात एकच प्रश्न सारं गाव विचारतंय, "आमची गेलेली मुलं परत येणार आहेत का?"

या शाळेची अवस्था कुणालाही माहित नव्हती, असं नाही. वर्षानुवर्षं ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवण्या केल्या. इमारत मोडकळीला आली आहे, दुरुस्ती करा… पण सगळ्यांनी कानाडोळा केला. जी दुरुस्ती झाली, ती केवळ कागदोपत्री. आता तीच इमारत पाचवी ते सातवीच्या वर्गात बसलेल्या मुलांसाठी मृत्यूचा सापळा ठरली.

"माझं पोरगं सकाळी हसतखेळत शाळेत गेलं होतं… दुपारी त्याचं झाकलेलं प्रेत परत आलं… सरकारनं काय केलंय? आता ते मला माझं पोरगं परत देईल का?" – एक आई तळमळून ओरडते. तिचे अश्रू थांबत नाहीत… आणि सारं गाव स्तब्ध झालेलं असतं.

ही दुर्घटना सकाळच्या प्रार्थनेनंतर घडली. मुलं वर्गात गेली आणि काही क्षणांत सातवीच्या वर्गाचा छप्पर अंगावर कोसळला. काही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. बाकी जखमींना गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. प्रशासन आलं, पण उशिरा. ज्या वेळी ते आले, तेव्हा काही नाजूक जीव आधीच निघून गेले होते.

"आता नुकसानभरपाई देणार, थोडंफार पैसा देणार… पण आमची मुलं परत मिळणार का?" – या एका प्रश्नात हजारो आईबापांचं दुःख आहे. सरकार, प्रशासन, राजकारणी, सगळ्यांनी जबाबदारी नाकारली आणि किंमत चुकवली ती या छोट्या जीवांनी.

आज पीपलोद गाव शोकमग्न आहे… पण त्या शोकाच्या आड एक संताप धुमसतोय. ही दुर्घटना नव्हे, तर व्यवस्थेच्या बेफिकिरीचं हत्याकांड आहे आणि त्या हत्येची जबाबदारी कोण घेणार?

Comments
Add Comment