Friday, August 15, 2025

हृदयद्रावक! आईची एक चूक... आणि बाराव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज आले समोर

हृदयद्रावक! आईची एक चूक... आणि बाराव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज आले समोर

वसई: वसई पूर्वेकडील नायगाव परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्वेकडील नवकार इमारतीमध्ये एका ४ वर्षीय चिमुकलीचा इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्विका प्रजापती असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा CCTV फुटेज देखील समोर आला आहे, जो पाहणाऱ्यांचे हृदय हेलावून टाकतो.

प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना अन्विकाच्या घराबाहेर घडली. CCTV फुटेजमध्ये दिसून येते की, एक महिला अन्विकाला ती जास्त कुठे फिरू नये म्हणून, घराबाहेर चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवते. ती बहुदा तिची आई असावी असा अंदाज आहे. यादरम्यान स्टँडवर बसलेली अन्विका आईची काही सेकंदासाठी पाठ फिरत नाही, तोच स्टँडला लागून असलेल्या खिडकीवर बसण्यासाठी गेली. मात्र, काही कळायच्या आतच तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली पडली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अन्विका इमारतीवरून खाली पडल्याचे लक्षात येताच, इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. परंतु, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने अन्विकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. नायगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. अन्विकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यामध्ये काही निष्काळजीपणा झाला आहे का, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा सखोल तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा