Friday, August 15, 2025

नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरील १३८ अनधिकृत भोंगे हटविले; आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरील १३८ अनधिकृत भोंगे हटविले; आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांविरोधात नाशिक पोलिसांनी निर्णायक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. एकूण १३८ भोंगे शांततेत उतरवण्यात आले असून, ही कारवाई भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर करण्यात आली आहे. शांततेचा अनुभव मिळत असून,कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभेत आमदार फरांदे यांनी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना दिली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत स्पष्ट केले की ‘भोंगा कोणत्याही धर्माचा भाग नाही’, आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर न्यायालयाने अमान्य केला आहे.

‘अजान ही प्रार्थना वैयक्तिक श्रद्धेचा विषय असू शकतो, मात्र त्यासाठी भोंग्याचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे’, असे फरांदे यांनी सभागृहात ठामपणे सांगितले. राज्य सरकारनेही या विषयावर कठोर भूमिका घेतली असून, यापुढे कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भोंग्यांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नाशिक पोलिस अँक्टिव्ह मोडवर आले असून, ठोस अशी कारवाई केली होती.

पोलीस आयुक्तांनाही दिले होते पत्र

आमदार फरांदे यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कारवाईस विलंब होत असल्यावर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, अखेर नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला. पाच पोलिस स्टेशन हद्दीत भोंगे उतरवण्याची कारवाई शांततेत आणि सामंजस्याने पार पाडली.

कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे...

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत: ७२ भोंगे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत: ३६ भोंगे इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत: १५ भोंगे मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत: १३ भोंगे गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत: २ भोंगे

Comments
Add Comment