Saturday, August 2, 2025

Mumbai Train Blast Case : मुंबई रेल्वे साखळी स्फोट; हायकोर्टाच्या निकालाला 'सर्वोच्च' स्थगिती, आरोपीनां पुन्हा तुरुंगात पाठवणार?

Mumbai Train Blast Case : मुंबई रेल्वे साखळी स्फोट; हायकोर्टाच्या निकालाला 'सर्वोच्च' स्थगिती, आरोपीनां पुन्हा तुरुंगात पाठवणार?
मुंबई : मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरणाची अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील २००६ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हायकोर्टाकडून दोनच दिवसांपूर्वी २१ जुलैला निर्णय देताना १२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. राज्य सरकारकडून महाधिवक्ते तुषार मेहता यांनी बाजू मांडली. २००६ साली मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अनेकांना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी दोषींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या ६ महिन्यांपासून यावर सुनावणी सुरू होती.पण या निर्णयाचा परिणाम इतर मकोका खटल्यांवर होऊ शकतो. हा निर्णय इतर खटल्यांमध्ये वापरलं जाईल आणि त्याचा फटक पोलीस तपास आणि अन्य यंत्रणांना बसू शकतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सध्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली.


सर्वोच्च न्यायालयाची नोटीस


उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, जे आरोपी या प्रकरणात पूर्वीच निर्दोष ठरवले गेले आहेत आणि आता जामिनावर किंवा मुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही. सध्या या प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सर्व पक्षकारांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.


 साखळी स्फोटात २०९ जणांचा मृत्यू


मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी ११ मिनिटांत झालेल्या ७ स्फोटांनी मुंबई हादरली होती. या साखळी बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिकजण जखमी झाले होते. २०१५साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Comments
Add Comment