
मँचेस्टर : रिषभ पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांना त्याला किमान सहा आठवड्यांच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुखापतीमुळे पंत चालणे कठीण झाले आहे. पण भारतीय संघाला गरज आहे याची जाणीव होताच स्वतःला झालेली दुखापत विसरुन पंत पुन्हा मैदानात आला. देशासाठी त्याने परत खेळण्याचा निर्णय घेतला. हळू हळू लंगडत मैदानात येत असताना रिषभने मैदानावरील मातीला आणि गवताला स्पर्श करुन नमस्कार केला. यानंतर तो फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेने जाऊ लागला. रिषभ पंतला बघून उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. पंतच्या लढाऊ वृत्तीची उपस्थितांनी जाहीर कौतुक केले.
वैद्यकीय उपचारांसाठी मैदानाबाहेर गेलेला रिषभ पुन्हा मैदानात आला. शार्दुल ठाकूर बाद झाला तेव्हा तळाच्या फलंदाजांपैकी कोणीतरी मैदानात येणार अशी शक्यता अनेकजण व्यक्त करत होते. पण सर्व तर्कवितर्क खोटे ठरवत रिषभ पंत मैदानात आला. त्याने कर्णधार शुभमन गिल आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक (कोच) गौतम गंभीर या दोघांशी चर्चा करुन दुखापत झाली असूनही संघासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. हा अनेकांसाठी धक्का होता. कारण दुखापतीमुळे रिषभ पंत आता इंग्लंड दौऱ्यातून बाद झाला असेच सर्वांना वाटत होते. प्रत्यक्षात पंत परत मैदानावर आला.
Rishabh Pant is hobbling out to a standing ovation from the Old Trafford crowd! 🤯 pic.twitter.com/I1vZ1MLR16
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 24, 2025
चालणे कठीण झाले असूनही लंगडत का होईना पण पंतने मैदानावर पाय रोवून घट्ट उभे राहण्याचा निर्णय घेतला. तो ठामपणे उभा राहिला. वॉशिंग्टन सुंदरला चांगली साथ दिली. पण पावसामुळे हा खेळ थांबवण्यात आला, तेव्हा पंत ३९ धावांवर खेळत होता.
...म्हणून रिषभ पंतला झाली गंभीर दुखापत
रिषभ पंत व्यवस्थित खेळत होता. तो मोठी खेळी करेल, असे वाटू लागले होते. तोच ख्रिस वोक्सला रिव्हर्स स्वीप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटला चाटून पायावर लागला. पंतला आधीच पायाला दुखापत झाली होती, त्यात आता पुन्हा जोरात चेंडू लागल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. इंग्लंडने पायचीतचे अपील केले. ते फेटाळले गेले. पण एव्हाना पायातून असह्य वेदना जाणवू लागल्यामुळे पंत कळवळून खाली पडला होता. पंतची अवस्था पाहून मैदानावर तातडीने गोल्फ कार्ट (लहान आकाराचे गोल्फ मैदानावर वापरले जाणारे वाहन) मागवण्यात आले. त्यावेळी पंत लंगडतच वाहनात बसला होता, त्यामुळे तो परत मैदानात येईल असे वाटत नव्हते.