Friday, August 15, 2025

मराठी विरोधात गरळ ओकणारे खासदार दुबे नरमले, संसदेच्या इमारतीत नेमकं झालं तरी काय ?

मराठी विरोधात गरळ ओकणारे खासदार दुबे नरमले, संसदेच्या इमारतीत नेमकं झालं तरी काय ?

नवी दिल्ली : राज ठाकरे आणि उद्धव यांनी महाराष्ट्रात भाषावादाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना खासदार निशिकांत दुबे यांच्या काही वक्तव्यांमुळे आणखी महत्त्व आले होते. निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषकांच्या वर्तुळात हिरो बनण्याच्या प्रयत्नात मराठी बोलणाऱ्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. हे प्रकरण संसदेत गाजले. महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संघटीतपणे धारेवर धरले. अखेर निशिकांत दुबे यांचा सूर नरमला.

महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निमित्ताने हिंदी सक्ती सुरू असल्याचा दावा विरोधकांनी सुरू केला. त्यातच काही परप्रांतीयांनी मराठीचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दणका दिला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ही टीका करताना त्यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली. त्याचे पडसाद उमटले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संघटीतपणे धारेवर धरले. कामकाज स्थगित झाल्यानंतर संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबेंना गाठून महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी त्यांना जाब विचारला.

मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही... मराठी भाषकांविरोधातील तुमची ही आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या समोर आहोत, आम्हाला तुम्ही मारा, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी घेतला. एकदम अनेक महिला खासदार गोळा झाल्याचे बघून खासदार निशिकांत दुबे यांचा स्वर नरमला. हे बघून महिला खासदारांनी जय महाराष्ट्र असा जयघोष केला. एकूण वातावरण बघून महिला खासदारांसमोर हात जोडून आपण माझ्या बहिणीसमान आहात असे सांगत पुढे काहीही न बोलता खासदार निशिकांत दुबे संसदेच्या लॉबीतून लगेच निघून गेले.

भाषेबाबतचे महाराष्ट्राचे धोरण

उद्धव सरकारने महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयात बदल करुन फडणवीस सरकारने पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी सक्तीची करतानाच तिसरी भाषा म्हणून कोणतीही एक भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय दिला. या पर्यायासाठी सरकारने हिंदीसह अनेक भारतीय भाषांचा पर्याय दिला होता. पण विरोधकांनी राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती सुरू केल्याचा दावा केला. हा दावा सुरू असताना भाषावादाच्या राजकारणाला चिथावणी देणाऱ्या राजकीय घडामोडी घडल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >