
पुणे : गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे . कोयता गँगची दहशत हा एक चर्चेचा विषय झाला आहे . कोयता गँगचे गुंड अनेकदा कुठल्यातरी वादावरून हातात कोयते घेऊन नागरी वस्तीत रात्री अपरात्री दहशत निर्माण करतात . स्थानिकांना त्रास देतात , वाहनांची तोडफोड करतात . पुण्यातील भवानी पेठ येथे पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कोयते उपसत तरुणांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हीच इथले भाई म्हणत तरुणांच्या जमावाने १०-१२ गाड्या फोडल्याचा प्रकार समोर आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
पुण्यातील भवानी पेठ परिसरात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या टोळक्याने किरकोळ कारणावरून हातात कोयते आणि तलवारी घेत परिसरात हिंसाचार घडवून आणला. या तरुणांनी रस्त्यावर उतरून १० ते १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या तरुणांनी 'आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये' असा इशारा देखील दिला. त्यांच्या या दहशतीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र या वादाला हिंसक वळण लागले . मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणांनी नागरी वस्तीत जमाव करून हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवत तोडफोड केली. लोकांना घाबरवले . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.