डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
भाषा... ही कशी बरं तयार झाली, होते? ध्वनी, शब्द, वाक्य, अर्थ यांच्या संगमाने भाषा तयार होते. ही भाषा मौखिक, लिखित, संकेतात्मक याद्वारे व्यक्त केली जाते. मानव सोडून इतर सर्व घटक त्यांचे संवाद साधण्यासाठी हावभावांचा, शारीरिक हालचालींचा, विशिष्ट ध्वनींचा, रंग बदलण्याचा, शारीरिक गंधांचा उपयोग करतात. एक वैयक्तिक अनुभव आहे की, जेव्हा तुम्ही निसर्गातील कुठल्याही घटकांशी म्हणजे झाड, पान, फुलं, खोडं, दगड, सूक्ष्मजीव कशाशीही बोलला तरीही मनातल्या संवेदना, हृदयाची भाषा त्यांना समजते. थोडक्यात काय तर सजीव आणि निर्जीव घटक दोघेही भाषा समजतात. निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचा असा एक ध्वनी दिला आहे, अगदी निर्जीव वस्तूला सुद्धा. आपल्याला निर्जीव वाटणारी वस्तू का बरं सजीव असते? कारण आपली ऊर्जा. सजीव सृष्टीतील काही घटक हे त्यांच्या भावना शब्दातून तर काही हावभावातून व्यक्त करतात जे प्रत्येक जण समजू शकतात. नैसर्गिक शब्द हे प्रत्येक प्रजातीप्रमाणे वेगळे असतात.
मानव काही पशू-पक्षीच पाळतो. सगळे पाळत नाही आणि त्यांच्याबरोबर आपला सुसंवाद नेहमी होत असतो. जसजसे आपण एकमेकांच्या सान्निध्यात राहतो तसतसे आपले बोलणे त्यांना समजते आणि जेव्हा आपण त्यांच्यासोबत राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा त्यांची भाषा समजायला लागते. मग ही भाषा शब्दांमध्ये होते का? शब्द आपण वापरतो आणि ते त्यांचा ध्वनी. तरीही आपण एकमेकांशी किती छान सुसंवाद करतो. मी लहानपणापासून पक्ष्यांशी, प्राण्यांशी, झाडांशी, कीटकांशी सर्वांशीच बोलत आले आहे. त्यांचे अध्ययन करताना खूप म्हणजे खूप गोष्टी लक्षात आल्या. अगदी झाडांच्या पानांनी प्रेमाने केलेला स्पर्श बराचसा संवाद साधून जातो. जर त्यांना काही वचन दिले तर खरंच ते वाट बघताना सुद्धा मी पाहिले आहेत. नि:स्वार्थी, प्रेमळ, कोणाशीही उगाच शत्रुत्व नसणारे, निसर्ग नियमानुसार चालणारे असे हे सजीव सृष्टीतील परमेश्वर निर्मित गुणवंत घटक. जेव्हा पक्ष्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची भाषा शिकताना खूप गोष्टी समजल्या. एवढेच काय तर गिनीपीग उंदराशी सुद्धा संवाद साधल्यावर उत्तर मिळाले आहे. गंमत म्हणजे, आपली भाषा ते लगेच समजतात. कशी? याचा जेव्हा विचार केला, अनुभव घेतला, अध्ययन केले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, आपल्या चेहऱ्याचे हावभाव, आपल्या ओठांची हालचाल आणि आपल्या आवाजाची लय यातून आपण या जगातील कुठल्याही सजीव घटकांशी सुसंवाद साधू शकतो. तसं तर फुलांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वच घटकांशी बोलत आले आहे आणि या सर्वांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियेमधून त्यांच्या भावना प्रकट करताना चांगले-वाईट, सुख-दुःख, रडणं-हसणं अनुभव घेतले आहेत.
मी नाशिकला अधूनमधून जात असते आणि गेस्ट हाऊसला राहते. त्या गेस्ट हाऊसच्या जवळ एक जांभळाचे झाड आहे. कुणास ठाऊक पण मी गेल्यावर बाल्कनीत उभे राहून त्या झाडाशी कायम बोलते. सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग करून फांद्यांपुढे हात केल्यावर खरंच त्या फांद्या हाताला येऊन स्पर्श करीत. गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा त्या गेस्ट हाऊसला उतरले तेव्हा तोच रूम मिळाला आणि प्रत्येक वेळेला त्या झाडाची फांदी हाताला स्वतःहून स्पर्श करीत असल्याचे जाणवले. जणू काय ते झाड मी येण्याची वाटचं पाहातंय. आमचा सुसंवाद हा कायमचं सुख आणि आनंद देऊन गेलाय. एकदा सीताफळाची झाडं दोन वेगळ्या कुंड्यांमध्ये आली होती. त्यातील एक झाड माझ्याकडून फांदी दुसरीकडे लावण्याच्या गडबडीत तुटली गेली. दुसऱ्या दिवशी असे पाहण्यात आले की, तुटलेली फांदी दुसऱ्या कुंडीतील झाडाच्या फांदीवर वाकून पडली होती. दुःखाने रडत असल्याची ती जाणवली. खरंच डोळ्यांत अश्रू आले आणि त्या झाडाची माफी मागितली. काही दिवसांनी ते झाड गेले. माझ्यासाठी ही घटना खूप हृदयद्रावक आणि वेदनामय होती. जगभरात प्राण्यांची भाषा समजण्यासाठी वैज्ञानिक अनेक प्रयोग करीत आहेत. त्यांचा विकास आपल्यासारखा झाला नाही असे सुद्धा वैज्ञानिकांचे मत आहे; परंतु मी या वैज्ञानिकांपेक्षा भारतीय सृष्टी संशोधक म्हणून यापुढे जाऊन एवढे ठामपणे सांगू शकते की, परमेश्वराने प्रत्येक घटक निसर्गाच्या आणि सृष्टीच्या गरजेप्रमाणे आणि फक्त निसर्ग नियमाप्रमाणेच बनवला आहे. त्यांत मानवाने ढवळाढवळ करू नये.
आपण इतर जीवसृष्टी विषयी पहिले, आता मानवाबद्दल पाहूया. जागतिक वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला होता. सर्वधर्मीय बाळांना एकत्र केले. त्यांच्यासमोर कोणताही संवाद साधला गेला नाही. तरीही सर्व बाळांच्या तोंडून येणारा प्रथम ध्वनी ‘अ’च होता. याचा अर्थ भारतीय वैज्ञानिक म्हणजे आपले ऋषीमुनी यांनी किती विचारपूर्वक शब्दांना महत्त्व देऊन आपले शब्द भांडार वाढवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कृत भाषेला विशेष महत्त्व आहे. विचार केला तर भारतीयांची संस्कृत भाषा ही मूळ भाषा आहे. ती पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली आहे. जेव्हा मानवाबद्दल अध्ययन केले तेव्हा लक्षात आले की, अ म द हे मूळ शब्द आहेत. त्यातून त्यांच्या त्यांच्या भाषेप्रमाणे शब्द निर्मिती होत जाते. उदाहरणार्थ भारतात अ-आ वरून आई तर इतर देशांमध्ये म वरून ममा - मम्मी, द वरून दादा - डॅडी. कोणत्याही जाती धर्मामध्ये असू दे, ही तीन मुळाक्षरे या बाळांच्या तोंडी असतातच. म्हणूनच हे शब्द घरातील पालकांच्या नावाने गेले आहेत. तेथे धर्म, जातपात काहीही नाही. तर आफ्रिकेतील काही आदिवासी हे शब्द न वापरता फक्त ध्वनी निर्मिती करतात. उदाहरणार्थ शिट्या वाजवणे, जिभेने टॉक-टॉक करणे. कारण ते गर्द जंगलामध्ये राहतात आणि त्यांच्या आसपास पक्षी आणि प्राणी यांचाच ध्वनी असतो. शिवाय जगातील इतर मानवाशी त्यांचा कोणताही संपर्क नसतो. याचा अर्थ की प्रत्येक जीवाच्या भाषेचा संबंध हा त्याच्या आसपासच्या वातावरणावर अवलंबून असतो. काही उच्चार ध्वनी असे आहेत की, त्याला तुम्ही शब्द देऊ शकतच नाही. या विश्वातील प्रत्येक जीव हा येणाऱ्या पिढीला त्यांची भाषा शिकवत असतो. म्हणून तर पिढ्यानपिढ्या या भाषा चालत आल्या आहेत. जर निसर्गाचा तोल सुटला तर काय होईल? आपण आता निसर्गाला त्याचे रौद्ररूप दाखवण्यास भाग पाडत आहोत. जिथे आपल्याला सुखासुखी जगण्याची शाश्वती नाही तिथे या वादविवादाने काय उपयोग होणार आहे? त्यापेक्षा प्रत्येकाने अध्यात्मिक होऊन विचारांची दिशा सकारात्मक केली तर? खरंच असं होईल का? फक्त मानवामध्येच भाषांचे वैविध्य असल्यामुळे आपल्याला भाषेच्या अडचणी येतात किंबहुना एकमेकांना समजून घेण्याच्या. तरीही आपण अनेक वर्षांपासून एखाद्या भाषेच्या सान्निध्यात राहिलो तर आपल्याला ती भाषा नक्कीच येते. आपण ती चांगल्या प्रकारे समजू आणि बोलू शकतो मग ती कोणतीही भाषा असो. भाषेचा आदर करणे आवश्यक आहे. एकमेकांच्या भावना समजण्यास आणि गरजपूर्ती करण्यास भाषा हे भाव स्त्रोत परमेश्वराने आपल्याला दिले आहे. मानव सोडून इतर कोणताही घटक ज्यांच्याकडे फक्त ध्वनी आहे तरीही ते निसर्गाचा दुरुपयोग करत नाहीत.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com