
नवी मुंबई : राज्यात मराठी-हिंदी वाद सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे आक्रमक झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटत आहेत .
मराठी बोलण्याचा वाद आता कॉलेज मधील तरुणांपर्यंत जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीतील कॉलेजबाहेर मराठी बोलण्यावरून परप्रांतीय तरुणांनी सूरज पवारला मारहाण केली.
सूरज पवार मराठीत बोलत असल्याने तू मराठी बोलू नको असा दम फैजन नाईक याने दिला . त्यानंतर, दोघांमधील वाद वाढल्याने फैजन नाईक याने फोन करून आपल्या इतर तीन मित्रांना कॉलेजच्या बाहेर बोलवले. फैजन आणि त्याच्या मित्रांनी सूरज पवार याला हॅाकी स्टिकने मारहाण केली. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली . जखमी सूरजवर जवळील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे किंवा गंभीर दुखापत करणे), ३५२ (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे), ३५१(२) आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी ), कलम ३(५) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .