
धनकवडीत १८ वाहनांची तोडफोड
पुणे : धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका टोळक्याने कोयते, दांडकीचा धाक दाखवून १८ वाहनांची तोडफोड केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रहिवाशांवर टोळक्याने शस्त्राने वार केले. शहर परिसरात आठवडाभरात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. हडपसरमधील रामटेकडी, भवानी पेठ, तसेच कोंढवा मध्येही घटना घडल्या आहेत. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी तीन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, तसेच नवनाथनगर भागात दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी आरडाओरडा शिवीगाळ करून रिक्षा, तीन मोटारी, दोन शालेय व्हॅन व एका टेम्पोची तोडफोड करून ते फरार झाले होते. कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी रिक्षाची काच फोडली होती. भवानी पेठ, मंजुळाबाई चाळ, औंध, विधाते वस्ती परिसरात वाहनांची मोडतोड केली होती. तसेच, माणिकबागेतही १५ वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन यांनी दिली.