Sunday, August 3, 2025

वेग मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा

वेग मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा

जगाला आता वेग हवा. कुणालाही थांबायला वेळ नाही. काळाची गती वाढली. जगभरात हायस्पीड रेल्वे, बुलेट ट्रेन, मेट्रोचा विस्तार होत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. आता तिच्या कामाला गती आली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली असेल. त्यानंतर तिचा दिल्लीपर्यंत विस्तार होऊ शकतो.



प्रा. सुखदेव बखळे


केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. हा बोगदा २१ किलोमीटर लांबीचा आहे. या अंतर्गत एका २.७ किलोमीटर लांबीच्या अखंड बोगद्याचेही बांधकाम पूर्ण झाले. या प्रकल्पाअंतर्गत एकूण पाच किलोमीटरचे बांधकाम शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ (एनएटीएम) वापरून केले जात आहे. यासोबतच उर्वरित १६ किलोमीटरचे बांधकाम ‘टनेल बोरिंग मशीन’(टीबीएम) वापरून केले जाईल. या बोगद्यात ठाणे खाडीखालील सात किलोमीटर लांबीचा समुद्राखालील भागदेखील समाविष्ट आहे. ‘एनएटीएम’ विभागात बोगद्याचे बांधकाम जलद करण्यासाठी, घणसोली आणि शिळफाटा येथे एकाच वेळी उत्खनन करण्यास परवानगी देणारा एक अतिरिक्त ‘ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल’ (एडीआयटी) बांधण्यात आला. आतापर्यंत शिळफाटा येथून सुमारे १.६२ किलोमीटर उत्खनन झाले आहे. याशिवाय ‘एनएटीएम’ विभागातील एकूण प्रगती सुमारे ४.३ किलोमीटर आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, म्हणून व्यापक सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. या सुरक्षा उपायांमध्ये ‘ग्राऊंड सेटलमेंट मार्कर’, ‘पायझोमीटर’, ‘इनक्लिनोमीटर’, ‘स्ट्रेन गेज’ आणि ‘बायोमेट्रिक ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम’चा समावेश आहे. असे म्हटले जाते की, यामुळे आजूबाजूच्या संरचनांना नुकसान होऊ न देता सुरक्षित आणि नियंत्रित बांधकाम सुनिश्चित केले जात आहे.


या बांधकामाबद्दल ‘एनएचएसआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक विवेककुमार गुप्ता म्हणाले, की आम्ही २१ किलोमीटरपैकी २.७ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण केले आहे. यानंतर बोगद्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होईल. त्यानंतर आरसी ट्रॅक बेड टाकले जाईल आणि ट्रॅक बसवण्याचे काम त्वरित सुरू केले जाईल. पावसाळ्यानंतर लगेचच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महाराष्ट्र विभागातील काम जलद गतीने व्हावे आणि नियोजित वेळेनुसार पूर्ण व्हावे, असा आमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी दमणगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बांधण्यात आलेला हा सोळावा नदी पूल आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील दमणगंगा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये एकूण २१ पूल बांधले जाणार आहेत. ‘एनएचएसआरसीएल’ने सोळा नदी पूल पूर्ण केले आहे. वलसाड जिल्ह्यात असलेल्या पाच नदी पुलांपैकी पाचही पूल आता पूर्ण झालेत. अहमदाबाद ते मुंबई या संपूर्ण कॉरिडॉरवर २५ नदी पूल बांधले जात आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातील ‘पहिला हाय-स्पीड’ रेल्वे प्रकल्प आहे. तो मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडेल. हा ५०८ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. बुलेट ट्रेनचा कमाल वेग ३२० किलोमीटर प्रति तास असेल. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआर मार्ग (दादरा आणि नगर हवेलीतील ४.३ किलोमीटरसह) सुमारे ५६ किलोमीटर लांब आहे. तो जरोली गावापासून सुरू होतो आणि वाघलदरा गावावर संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा बोगदा, पाच नदी पूल आणि एक पीएससी पूल (२१० मीटर लांबीचा) यांचा समावेश आहे. वलसाडमध्ये पूर्ण झालेल्या पुलाची लांबी ३६० मीटर आहे. त्यात नऊ पूर्ण स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर) समाविष्ट आहेत. येथे चार मीटर आणि ५ मीटर व्यासाचा प्रत्येकी एक आणि ५.५ मीटर व्यासाचे आठ वर्तुळाकार खांब समाविष्ट आहेत. हा पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान आहे. या दोन स्टेशनदरम्यान आणखी एक नदी पूल बांधण्याचे काम दारोठा नदीवर पूर्ण झाले आहे. ही नदी वापी बुलेट ट्रेन स्टेशनपासून एक किलोमीटर आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनपासून सुमारे ६१ किलोमीटर अंतरावर आहे. वलसाड जिल्ह्यात इतरही नदी पूल पूर्ण झाले आहेत. दमणगंगा नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वालवेरी गावाजवळील सह्याद्री टेकड्यांमधून उगम पावते. ती महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमणमधून सुमारे १३१ किलोमीटर वाहते आणि अरबी समुद्रात विलीन होते. ही नदी सिंचनाचे स्रोत आहे. ही नदी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वापी, दादरा आणि सिल्वासासारखी औद्योगिक शहरे तिच्या काठावर आहेत. नदीवर बांधलेले मधुबन धरण हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे. त्याचा फायदा गुजरात, दादरा-नगर-हवेली आणि
दमण-दीवला होतो.


भारतीय बुलेट ट्रेनच्या इतिहासात ७ जुलै या तारखेला फार महत्त्व आहे. रेल्वेमंत्र्यांनी सात जुलै रोजी सादर केलेल्या २०१४-१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली. यापूर्वी ‘हाय स्पीड रेल कॉरिडॉर’चा प्रस्ताव बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. अर्थसंकल्पीय भाषणात मुख्य शहरांमधील प्रवास वेळ कमी करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट होते. गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉरचे काम वेगाने झाले. महाराष्ट्रातले काम तुलनेने मंद होते; परंतु अलीकडेच या कामाला गती आली आहे. कॉरिडॉरमध्ये बांधल्या जाणाऱ्या बारापैकी गुजरातमध्ये असलेल्या आठपैकी सहा स्थानकांवर स्ट्रक्चरल काम पूर्ण झाले आहे, तर महाराष्ट्रातील चारपैकी तीन उन्नत स्थानकांवर आणि मुंबईत भूमिगत स्थानकाचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात १५६ किलोमीटर ट्रॅक बांधण्यात आला आहे. रेल्वे स्थानक बांधल्या जात असलेल्या बारा शहरांपैकी मुंबई, ठाणे, विरार, बोईसर ही स्थानके महाराष्ट्रात असून गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशा स्थानकांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद ‘हाय-स्पीड रेल कॉरिडॉर’साठी शंभर टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली येथून एकूण १३८९.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कोरोना काळामुळे आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे संपादनास विलंब झाला.


प्रकल्पाअंतर्गत बहुतेक, म्हणजेच एकूण सुमारे ४६८ किलोमीटर उन्नत आहे. त्यामुळे भूसंपादनाची आवश्यकता कमी झाली. मुंबई-अहमदाबाद ‘हाय-स्पीड रेल कॉरिडॉर’ प्रकल्पाची अंदाजित किंमत १.०८ लाख कोटी ते १.६५ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे आठ तासांचा प्रवास दोन तासांमध्ये पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (जेआयसीए) ने या प्रकल्पासाठी ८० टक्के कर्ज दिले आहे. जपानमधून बरीच यंत्रसामग्री आयात केली जात आहे. भविष्यात हा ‘हाय-स्पीड रेल कॉरिडॉर’ दिल्लीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. त्याचा फायदा राजस्थान आणि हरियाणालाही होईल. मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनची जपानमध्ये अंतिम चाचणीही झाली आहे. ती पुढील वर्षी भारतात आणली जाऊ शकते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर भारतात लगेचच नवी दिल्ली-पाटणा, मुंबई-हैदराबाद आदी मार्गावरही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा घाट आहे. त्यापैकी मुंबई-हैदराबाद मार्गाची घोषणा पूर्वीच झाली आहे; परंतु या योजनेचे सर्वेक्षणच अजून झालेले नाही. मुंबई-नागपूर मार्गाचाही विचार केला जाऊ शकतो. आता नवी दिल्ली-पाटणा मार्गाची घोषणा झाली आहे. त्यानंतर मुंबई-चेन्नई, बंगळूरु, कोलकत्ता आदी शहरांसाठीही बुलेट ट्रेनच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.


(लेखक अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

Comments
Add Comment