Saturday, August 2, 2025

आता ज्येष्ठ कलाकारांना दरमहा मिळणार पाच हजार रुपये मानधन

आता ज्येष्ठ कलाकारांना दरमहा मिळणार पाच हजार रुपये मानधन

मुंबई : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.


या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. तसेच दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयोमानानुसार ज्येष्ठ असणारे विधवा, परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका पूर्णतः कलेवर अवलंबून आहे, व इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही, असे कलाकार पात्र ठरतील. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळ किंवा नियमित मासिक पेन्शन योजनेत लाभार्थी असता कामा नये तसेच कलाकार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्र फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारची प्रमाणपत्रे (लागू असल्यास) आणि नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment