
कल्याण : नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात अमराठी असलेल्या गोपाळ झा याला अटक करण्यात आली होती. गोपाळची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली आहे. न्यायालयाने गोपाळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सोशल मीडियात मराठी तरुणीला अमराठी गोपाळ झा बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल आहे.
डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा इतकंच रिसेप्शनिस्ट असलेली मराठी तरुणी म्हणाली. पण हे ऐकून गोपाळ झा संतापला. त्याने तरुणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपाळ झा याची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीला झालेल्या मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. यामुळे आरोपी विरोधात भक्कम पुरावा असल्याचे स्थानिक सांगत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी स्थानिक करत आहेत.
डॉक्टरांच्या केबिनमध्ये कोणी आत जावे किंवा जाऊ नये याचा निर्णय डॉक्टर घेतात. त्यांनीच बाहेर बसलेल्या एमआरला आत पाठवण्याची सूचना दिली होती. या सूचनेचे पालन करत एमआरला आत पाठवत होते. त्यावेळी नशेत असलेल्या गोपाळ झा याने जबरदस्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला केबिनमध्ये जाण्यास मनाई केली आणि एमआरला आत पाठवले म्हणून तो चिडला. त्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कपडे फाडले, अशी तक्रार फिर्यादी तरुणीने पोलिसांसमोर दिली आहे.