
कल्याण : कल्याण पूर्व (Kalyan East) शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली होती. एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतील पुरूषाने बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडीओमध्ये गोकुळ झा नावाचा व्यक्ती एका मराठी तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी गोकुळ झा याच्यासह त्याचा मोठा भाऊ रंजीत झा याला पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली (Sonali) हिने आधी एका महिलेला कानशिलात लगावली होती, असे एक व्हिडिओ फुटेज सध्या समोर आले आहे.
नवीन व्हिडिओमध्ये काय?
सदर प्रकरणातील नवीन व्हिडीओमध्ये गोकुळ झा, रंजीत झा त्यांची आई आणि सून उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोकुळ झा यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये गोकुळ झाने तरुणीला पहिली लाथ मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळही केली. यानंतर गोकुळ झा याला शांत करत त्याच्या आईने त्याला रुग्णालयाच्या बाहेर पाठवले. यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारलं. त्यानंतर गोकुळ झा बाहेरुन धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
View this post on Instagram
गोकुळ झा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार
दरम्यान, गोकुळ झा हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे. याच्यावर कल्याण कोळशेवाडी उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्याकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होऊ शकेल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.
मारहाण करणे योग्य नव्हते गोकुळ झाच्या आईचा निर्वाळा
सदर घटनेवर गोकुळ आणि रंजीत झा यांची आई म्हणाली की, सदर घटना माझ्या समोर घडली असून रिसेप्शनिस्ट तरुणीनेच आधी माझ्या सूनेवर हात उचलला. मुलीने माझ्या सुनेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर तरुणीने माझ्या सूनेच्या कानाखालीसुद्धा मारली. हा सर्वप्रकार गोकुळ झाने पहिला आणि बाहेरुन धावत येत त्याने तिला लाथ मारली. मात्र त्याने मारहाण करणे योग्य नव्हते, असा स्पष्ट निर्वाळाही आईने दिला आहे.