
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. या पदासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत bsf.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. एकूण ३५८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांमध्ये पुरुषांसाठी ३४०६ आणि महिलांसाठी १८२ जागा असतील. या भरतीसाठी अर्ज २६ जुलै २०२५ पासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.
भरती स्वयंपाकी, पाणी वाहक, वेल्डर, सुतार, प्लंबर, रंगारी, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, मोची, शिंपी, धोबी, न्हावी, सफाई कामगार या कामांसाठी होणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तांत्रिक रिक्त जागांसाठी आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच ट्रेड चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधन असेल.
सीमा सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यापार चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. सीमा सुरक्षा दलात क्रीडा प्रकारात कॉन्स्टेबल भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत आणि ग्रुप सी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिकसाठी ३० जुलै २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येईल.