
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कोसळणार
मुंबई : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातीलही बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे.
विदर्भातही जोरदार पाऊस बरसत आहे. अरबी समुद्रावर पावसासाठी वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
तळ कोकणासह मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेत हवामान विभागाने काही ठिकाणी ‘अलर्ट’ जारी केले आहेत. बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.