Saturday, August 2, 2025

७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

निकालात त्रुटी राहिल्याचा राज्य सरकारचा दावा


मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली.


राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीकरिता सादर केली. यावेळी आमची एसएलपी तयार आहे. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै) रोजी यावर तातडीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली. त्यावर कैदेत असलेल्या ८ आरोपींना कालच्या निकालानंतर कारागृहातून सोडून देण्यात आले. तेव्हा आता इतकी घाई का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. राज्य सरकारची विनंती मान्य करत या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.


या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यात ५ पैकी ४ आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Comments
Add Comment