
बंगळुरू : भारतातील प्रसिद्ध फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिंत्राची सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate / ED) चौकशी सुरू केली आहे. मिंत्राची परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत चौकशी सुरू आहे. सरकारच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप मिंत्रावर आहे.
मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग करणाऱ्या मिंत्राने स्वतःला "घाऊक रोख आणि कॅरी" व्यवसाय म्हणून दाखवले. बंगळुरू येथील ईडीच्या कार्यालयाने मेसर्स मिंत्रा डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड (मिंत्रा) आणि त्यांच्या संबंधित कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (फेमा) च्या कलम १६(३) अंतर्गत १६५४,३५,०८,९८१/- रुपयांच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिंत्राने कागदोपत्री त्यांचे बहुतेक सामान मेसर्स वेक्टर ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकले आहे. हे व्यवहार कागदोपत्री दाखवून मिंत्रा आर्थिक गैरव्यवहार करत आहे. कायद्यांचे उल्लंघन करत, कर देण्याऐवजी मिंत्रा पैसे फिरवत आहे, असाही आरोप ईडीने केला आहे.
मिंत्रा २००७ - ०८ दरम्यान भेटवस्तूंच्या विक्रीसाठी सुरू केलेली कंपनी. पुढे २०११ मध्ये त्यांनी फॅशन आणि जीवनशैली उत्पादने विकण्यास सुरुवात केली आणि २०१४ मध्ये फ्लिपकार्टने मिंत्रा खरेदी केले. आता मिंत्रा १००० हून अधिक ब्रँडची १.५ लाखांहून अधिक उत्पादने विकते आणि देशातील ९००० पिन कोडवर डिलिव्हरी करते. पण बाजारातील स्थानाचा गैरवापर करुन कर देण्याऐवजी मिंत्रा सातत्याने कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन करत आहे. यामुळे ईडीने चौकशी सुरू केली आहे.
नियमानुसार थेट परकीय गुंतवणूक घेऊन व्यवसाय करत असलेल्या ई-कॉमर्स कंपन्या भारतात फक्त मार्केटप्लेस मॉडेलवर काम करू शकतात, म्हणजेच त्यांनी फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करावे जिथे तृतीय-पक्ष विक्रेते त्यांची उत्पादने विकतात. मिंत्रावर हा नियम मोडल्याचा आणि किरकोळ व्यवसायात थेट सहभागी झाल्याचा आरोप आहे.