Saturday, August 2, 2025

आधार, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत!

आधार, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत!

निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा


नवी दिल्ली  : प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणारे आधार कार्ड वा रेशन कार्ड विश्वसनीय कागदपत्रे नसल्याचा धक्कादायक दावा निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.


बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड स्वीकारणे नसल्याचे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. आयोगाने स्पष्ट केले की, या कागदपत्रांवर विश्वास ठेवता येणार नाही. आधार हे केवळ ओळख पुरवणारे दस्तऐवज आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बनावट रेशन कार्ड्स आहेत आणि अस्तित्वातील मतदार ओळखपत्रांवर अवलंबून राहिल्यास ही विशेष मोहीमच निष्फळ ठरेल.


विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या बिहारमध्ये बोगस मतदारांवरून गदारोळ सुरू आहे. परराज्यातील आणि परदेशातील नागरिकांची नावे मतदार यांद्यामध्ये आढळल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण, लोकांना मतदार म्हणून वैध असल्याचे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी दहा प्रकारची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.



निवडणूक आयोगाने शपथपत्रात काय म्हटले आहे?



  •  लोकप्रतिनिधी कायदा १९५० मधील नियम २१ (३) नुसार मतदान ओळखपत्र हे दुरुस्ती प्रक्रिया आणि मतदार यादीत मतदारांच्या नावावर आधारित आहे. मतदान ओळखपत्र सुधारणांच्या कक्षेते येते. त्यामुळे बिहारमध्ये मतदार याद्यांची पडताळणी करताना मतदान ओळखपत्र वैध पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.

  •  आधार कार्ड व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही आणि ते फक्त व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे. आधार क्रमांक नागरिकत्व प्रदान करत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने रेशन कार्ड अर्था शिक्षापत्रिकाही रहिवासाचा पुरावा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.


बिहारच्या मतदारांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार


निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी नागरिकांना बिहारचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, निवृत्तिवेतनाची पावती, पासपोर्ट, दहावी किंवा पदवी प्रमाणपत्र, विमा अथवा गुंतवणूक केल्यासंदर्भातील प्रमाणपत्र, कायमचा निवासी दाखला, जंगल वहिवाट दाखला, स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका यातील घराची नोंद, घर अथवा अन्य मालमत्तेचा कर भरल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्रे द्यावे लागणार आहे.

Comments
Add Comment