ब्राझील : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शाळेत शिकत असलेली १३ वर्षांची मुलगी हरवली होती. या हरवलेल्या मुलीची बातमी सांगताना वार्ताहराने चुकून वाहत्या पाण्यातील एका मृतदेहावर पाय ठेवला. योगायोगाने हा मृतदेह त्याच मुलीचा होता, जी हरवल्याची बातमी सांगितली जात होती. ही घटना ईशान्य ब्राझीलमधील बाकाबल येथील मीरिम नदीत घडली, जिथे ती मुलगी शेवटची दिसली होती.
द सन वृत्तानुसार , पत्रकार लेनिल्डो फ्रेझाओ नदीची खोली आणि ती मुलगी पोहत असलेल्या जागेचे दर्शन घडवण्यासाठी नदीत उतरला, परंतु नदीच्या पात्रात तिचा मृदेह असेल हे त्याला माहिती नव्हते. वार्तांकन सुरू होते त्यावेळी कॅमेरा ऑन होता. चित्रिकरण सुरू होते. व्हिडीओत माईक हाती घेऊन बोलत असलेला वार्ताहर अचानक उडी मारुन बाजुला होताना दिसतो. यानंतर पत्रकार घाबरलेला व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मी जिथे उभा होतो, तिथे पाण्यात आखील काहीतरी आहे. मला हात बघितल्यासारखे वाटले. कदाचित तिचा मृतदेह तर नसेल, अशी भीती पत्रकार बोलून दाखवतो.
पत्रकाराने दिलेल्या माहितीआधारे मृतदेहाचा शोध सुरू झाला. यानंतर पत्रकार लेनिल्डो फ्रेझाओ याने जी जागा सांगितली त्याच भागात पाणबुड्यांनी शोध घेतला आणि मुलीचा मृतदेह आढळला.
रायसा नदीत मित्रांसोबत पोहताना मुलगी बुडली होती. शवविच्छेदन तपासणीत मृत्यूचे कारण अपघाती बुडणे असल्याचे सिद्ध झाले, शारीरिक दुखापतीचे कोणतेही चिन्ह नव्हते. अखेर पोलिसांनी मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. नातलगांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेने एक दिवसाचा शोक जाहीर केला. मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
बातमी सांगताना पत्रकार लेनिल्डो फ्रेझाओ यांनी महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले. नदीपात्रात भोवरे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच नदीपात्र काही ठिकाणी जास्त खोल तर काही ठिकाणी कमी खोल आहे. या स्थितीचा अंदाज आला नाही तर दुर्घटना होण्याचा धोका जास्त असल्याचे पत्रकार लेनिल्डो फ्रेझाओने सांगितले.