
वॉशिंग्टन डीसी : इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी ऑगस्ट अखेरीस पदमुक्त होत असल्याचे जाहीर केले. राजीनामा देत त्यांनी ही घोषणा केली. गीता गोपीनाथ १ सप्टेंबर २०२५ पासून पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठातील जुन्या नोकरीवर परततील. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या जॉन झ्वान्स्ट्रा प्राध्यापक होत्या. या कामावर परत येऊन त्या आर्थिक विषयांवर संशोधन तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतील.
गीता गोपीनाथ २००५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत झाल्या. याआधी त्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. हार्वर्ड विद्यापीठात असतानाच गीता गोपीनाथ यांची इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) नियुक्ती झाली. त्या २०१९ मध्ये आयएमएफमध्ये पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत झाल्या. नंतर २०२२ मध्ये त्यांची पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. याच पदाचा राजीनामा देत गीता गोपीनाथ १ सप्टेंबर २०२५ पासून पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठातील जुन्या नोकरीवर परततील.
गीता गोपीनाथ यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देत आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी लवकरच नव्या व्यक्तीची पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती केली जाईल असे सांगितले. आता अमेरिकन ट्रेझरीकडून नव्या व्यक्तीच्या नावाची शिफारस आयएमएफमधील पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक या पदासाठी पाठवली जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील आयातीवर मोठे कर लादून देशाची व्यापार तूट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाला अनुकूल अशा व्यक्तीची आयएमएफमध्ये नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
आयएमएफमध्ये असताना गीता गोपीनाथ यांचे शोधनिबंध अनेक प्रमुख अर्थशास्त्र जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. गीता गोपीनाथ या स्वतःच्या यशाचे श्रेय भारतीय शिक्षण व्यवस्थेला देतात. त्यांचे शालेय शिक्षण म्हैसूरमध्ये झाले. दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून त्या बॅचलर झाल्या होत्या. यामुळे गीता गोपीनाथ यांच्या कामगिरीकडे भारतीय प्रसारमाध्यमांचे विशेष लक्ष होते.