Friday, August 15, 2025

Ramdas Athawale : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राचे किंगमेकर नेतृत्व! केंद्रिय राज्यमंत्री आठवलेंचा विशेष लेख

Ramdas Athawale : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राचे किंगमेकर नेतृत्व! केंद्रिय राज्यमंत्री आठवलेंचा विशेष लेख

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फडणवीसांना दिल्या खास शुभेच्छा

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुण तडफदार अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी लाभलेले नेते आहेत.त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने प्रगती करीत आहे. सर्व समाज घटक आणि सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन उत्कृष्ट समन्वय साधून महाराष्ट्र राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा राज्याच्या राजकीय पटलावर उमटवला आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला सर्वोच्च म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कामकाज सुरू आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे बौद्ध धम्माची धम्मक्रांती घडवली त्या नागभूमीतून त्या नागपूर मधून देवेंद्र फडणवीस घडले आहेत.त्यामुळे त्यांना आंबेडकरी चळवळीची चांगली जाण आणि जाणीव आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे ते सच्चे पाईक आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी इंदू मिल ची जमीन काँग्रेस सरकार ने दिली नाही मात्र २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेऊन कल्पकतेने इंदुमिल चा प्रश्न तातडीने सोडवला.त्यांनी प्रयत्न केल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात इंदुमिल ची जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी तातडीने मंजूर झाली.त्याचा मी साक्षीदार आहे.इंदुमिल ची संपूर्ण जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे.

लंडन मधील हेन्री रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राज्य सरकार ने घेऊन तिथे संग्रहालयरुपी स्मारक महाराष्ट्र सरकार तर्फे उभारण्यात आले आहे.त्याच्या उद्घाटनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः उपस्थित राहिलो होतो.जपान ला कोयासान विद्यापीठात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला त्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मी सुद्धा जपान ला गेलो होतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीचे विचार हे सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.त्या विचारांची प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करीत आहेत.विकासाची दृष्टी; आधुनिक तंत्रज्ञानाची जाण राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास असल्याने ते सोडवण्यासाठी अनेक नवे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले.मेट्रो रेल्वे चे जाळे महाराष्ट्रात उभारण्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते त्यामुळे लोक त्यांना मेट्रोमॅन मुख्यमंत्री म्हणतात.त्यांच्या कामाचा वेग बुलेट ट्रेन सारखा वेगवान आहे.त्याच वेगाने ते महाराष्ट्र राज्याची प्रगती करीत आहेत.

अर्थीक व्यापार उद्योग क्षेत्रासोबत सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रासोबत सामाजिक न्यायाची बांधिलकी ठेऊन महाराष्ट्र राज्याचा रथ पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवडून आले आणि देशात नरेंद्र युग सुरू झाले.तसेच महाराष्ट्रात ही २०१४ सालापासून देवेंद्र युग सुरू झाले आहे. २०१४ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.त्यांनी मुख्यमंत्री असताना मला अनेकदा भेटीसाठी वेळ दिला.अनेक जनहिताची कामे मार्गी लावली.इंदुमिल स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी सोडवला.

सन २०१४ पासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा चालत आला आहे.देवेंद्र फडणवीस नावाचा नवा तारा महाराष्ट्राच्या राजकीय आसमंताला आपल्या कर्तृत्व उजळवून टाकत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र चा नारा लागला. त्याला रोखण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र युग सुरू झाले आहे.देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र चा नारा त्यांनी आपल्या कर्तृत्वाने खरा करून दाखवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगती करीत आहे तशीच प्रगती महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करीत राहील यात काही शंका नाही. सत्तेच्या पदाची त्यांना हाव नाही.त्यांनी जनसेवा राष्ट्रसेवा आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे.त्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. २०१९ मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून ही त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ मित्रपक्षाच्या गळयात घालण्याचे औदार्य त्यांनी दाखवले. उपमुख्यमंत्री म्हणून ही त्यांनी आपले काम चोख बजावले. त्यामुळे मुख्यमंत्री ; विरोधीपक्षनेता ; उपमुख्यमंत्री असा प्रवास करून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.त्यांच्या या प्रवासात महाराष्ट्राला जाणले आहे की राज्याच्या राजकीय पटलावर आता एकमेव किंगमेकर नेतृत्व आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो! त्यांच्या हातून अशीच अविरत देशसेवा राज्याचे कल्याण घडत राहो! जय भीम!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा