मुदत संपलेल्या स्मार्टकार्डचे नूतनीकरणही ठप्प
अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाने मोठा दिखावा करीत कागदी ओळखपत्राच्या जागी प्रवाशांना स्मार्टकार्ड देण्याची योजना सुरू केली खरी; परंतु ही योजना सध्या बारगळली असून, तयार केलेले असंख्य स्मार्टकार्ड जिल्ह्यातील एसटी बस आगारातील आरक्षण कक्षात धुळखात पडून आहेत. त्यामुळे सध्या जुन्याच कागदी ओळखपत्राचा आधार घेत प्रवाशांना एसटीने प्रवास करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत मिळते. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटीची सवलत दिली जाते, तसेच नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सात दिवस, चौदा दिवस कुठेही प्रवास योजनेसाठी देखील एसटीचे पास मिळतात. मात्र लाभार्थ्यांना मिळणारे सवलत पास हे कागदी स्वरूपात असल्यामुळे ते पावसाळ्यात भिजून खराब होण्याबरोबरच गहाळ होण्याची भीती असते. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने स्मार्टकार्ड योजना सुरू केली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकातील आरक्षण कक्षात स्मार्टकार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. एटीएमसारखे अद्ययावत असे स्मार्टकार्ड पास व ओळखपत्र म्हणून हाताळताना प्रवाशांनाही आनंद वाटत होता. एसटीच्या स्मार्टकार्डच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच, एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य पासधारक प्रवाशांनादेखील स्मार्टकार्ड देण्यास सुरुवात केली.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून स्मार्टकार्ड योजनाच बंद पडली आहे. ज्या कंपनीकडून स्मार्टकार्ड दिले जात होते, त्या कंपनीला परवडत नसल्याने त्यांनी हे काम थांबविल्याची चर्चा एसटी महामंडळात सुरू आहे.
२०१६ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू झाली. एटीएम कार्डसारखे अद्ययावयत असे स्मार्टकार्ड विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य पासधारकांचे 'स्मार्ट' ओळखपत्र बनले. ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर नोंदणी मशीनमध्ये केली जात होती.
ज्या कंपनीला स्मार्टकार्ड तयार करण्याचे काम दिले होते, त्याच कंपनीने तांत्रिक कामांमध्ये बिघाड असल्याचे कारण पुढे केले आहे. सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना नव्याने स्मार्टकार्ड काढण्यापासून मुदत संपलेल्या स्मार्टकार्डचे नुतनीकरणही करणे थांबल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता आधारकार्डच्या व विद्यार्थ्यांना कागदी पासच्या भरोशावरच प्रवास करावा लागत आहे.
स्मार्टकार्ड योजना शासनाची आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना बंद झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डद्वारे एसटीतून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या जुन्याच पद्धतीने कामकाज करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार कामकाज सुरू आहे. स्मार्टकार्ड का बंद आहेत, याची माहिती अद्याप वरिष्ठ पातळीवर मिळालेली नाही.
- दीपक घोडे,
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड विभाग)