Friday, August 15, 2025

बांगलादेशच्या हवाई दलाचे विमान शाळेच्या इमारतीवर कोसळले, २७ जणांचा मृत्यू

बांगलादेशच्या हवाई दलाचे विमान शाळेच्या इमारतीवर कोसळले, २७ जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशच्या हवाई दलात असलेले चिनी बनावटीचे एफ-७ बीजीआय हे प्रशिक्षण विमान ढाका येथे 'माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज'च्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर १६४ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात ६० हून अधिक जखमींना बर्न इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या अनेकांवर उत्तरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बांगलादेश सरकारने देशात एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे.


जेव्हा विमान कोसळले त्यावेळी इमारतीत काही वर्ग सुरू होते. यामुळे मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट तौकीर इस्लाम यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा विमान कोसळले त्यावेळी शाळेत निवडक वर्ग सुरू होते. पहिल्या सत्राचे ८० टक्के विद्यार्थी घरी गेले होते. जे विद्यार्थी शाळेत होते त्यांच्यापैकी काहींचा विमान कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शाळेच्या निवडक शिक्षकांचाही समावेश आहे.


बांगलादेशच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले आहे की, "दुपारी १:०६ वाजता एक एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले आणि काही वेळातच ते कोसळले." अपघातानंतर विमानाला आग लागली. दूरवरून धुराचा लोट दिसत होता.


बांगलादेशकडे १६ चिनी बनावटीच्या एफ-७ बीजीआय विमानांचा ताफा आहे. ही विमानं रशियन बनावटीच्या मिग २१ या लढाऊ विमानांची चीनने तयार केलेली स्वस्तातली नक्कल असल्याचे सांगितले जाते. बांगलादेशच्या ताफ्यातील एक विमान ढाक्यात 'माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज'च्या इमारतीवर कोसळले.


एफ-७ बीजीआय विमानाची वैशिष्ट्ये


एफ-७ बीजीआय हे बांगलादेश हवाई दलाचे बहुद्देशीय लढाऊ विमान आहे. हे चीनच्या चेंगडू जे-७ लढाऊ विमानाची प्रगत आवृत्ती आहे. सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ च्या धर्तीवर बनवले गेले होते. बीएएफने हे लढाऊ विमान २०११ ते २०१३ दरम्यान खरेदी केले होते. ते थंडरकॅट स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एफ-७ बीजीआय विमान एकाच वेळी ६०० ते ६५० किमी पर्यंतचा लढाऊ पल्ला पार करू शकते, तर फेरी पल्ला २,२३० किमी पर्यंत आहे. ते जास्तीत जास्त १७,८०० मीटर उंचीपर्यंत उडू शकते. या लढाऊ विमानात २ तोफांसह ७ शस्त्रे बसवण्याची व्यवस्था आहेत. त्यावर ३ हजार किलोग्रॅम वजनाची क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब बसवता येतात. ते पीएल-५ आणि पीएल-९ क्षेपणास्त्रे, लेसर गाइडेड बॉम्ब आणि सी-७०४ जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.


Comments
Add Comment