मुंबई डॉट कॉम
एखाद्या नोकरदार कर्मचाऱ्याची जीवनाची साधी आखणी काय असू शकते, इमाने इतबारे, प्रामाणिकपणे नोकरी करावी घर प्रपंच सांभाळावा आणि निवृत्ती जीवन आपल्या कुटुंबासमवेत व्यतीत करावे. जर स्वाभिमानाने जगायचे असेल तर नोकरी दरम्यान येणारी रक्कम थोडी बाजूला काढावी व ती रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवून त्यावर आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण कोणाचाही आधार न घेता व्यतीत करावा मग या पैशाच्या जोरावर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कोणापुढे हात पाय पसरू लागू नयेत हाच त्याचा एक उद्देश असतो. मात्र जर हाच शेवटचा पैसा त्याच्या हाती राहिला नाही, तर त्याची काय अवस्था होत असेल याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या निवृत्तीनंतर नरकयातना भोगत असलेले बेस्ट कर्मचारी होय.
एकेकाळी बेस्टमध्ये नोकरी म्हणजे एक सुवर्णकाळ होता आणि तो भोगलाही मात्र आज निवृत्तीनंतरचे जीवन म्हणजे याच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नशिबी हे कोणत्या जन्माचे पाप असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आपल्याच पैशासाठी निवृत्तीनंतर करावयास लागणारा संघर्ष त्यांच्या वाटेला येत आहे. कारण सध्या बेस्टची आर्थिक अवस्था डगमगीत झाल्यामुळे बेस्टकडे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे देणे देण्यासाठी पैसा नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकीकडे कर्मचारी निवृत्त होत असताना दुसरीकडे मात्र त्याच कर्मचाऱ्यांना आपल्याच पैशासाठी दारोदारी भटकावे लागत आहे. ज्या आस्थापनाने त्यांचे जीवन घडवले त्यांना भरभरून दिले त्यांचा संसार उभा केला त्याच आस्थापनांविरुद्ध त्यांना नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत आहेत.
त्यामुळे कित्येक जणांची निवृत्तीनंतर मानसिक अवस्था बिघडत आहे तर कित्येक जणांचे जगणे आता मुश्किल होऊन बसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या या बरबादतेला जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. बेस्ट उपक्रमातून २०२२ पासून ते आज २०२५पर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांची आजपर्यंतची ग्रॅज्युएटीची अथवा अंतिम देयाची कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही ग्रॅज्युएटी कायदा १९७२ अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला व अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर तीस दिवसांच्या कालावधीत ग्रॅज्युटी रक्कम अदा करणे बेस्ट उपक्रमास बंधनकारक होते आणि यापूर्वी ती रक्कम देण्यात येत होती; परंतु गेली तीन वर्षे सदर रक्कम बेस्ट उपक्रमांकडून आजपर्यंत अदा करण्यात आलेली नाही.
यामध्ये झालेला विलंब हा अन्यायकारक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मानसिक व आर्थिक ताण निर्माण करणारा ठरत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या खूपच गंभीर होत चालल्या आहेत. निवृत्ती पक्षात कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वयोपरत्वे येणारे आजार, यांना सामोरे जाण्यासाठी निवृत्ती लाभाशिवाय इतर कोणताही पर्याय कर्मचाऱ्यांकडे नसतो.
या वयात वैद्यकीय मदत आणि योग्य पोषण ही दीर्घ निवृत्ती जीवनाची पुंजी असते; परंतु बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक गैरवस्थापनामुळे गलथनपणामुळे या वयात हे सर्व लोक केवळ स्वतःचे पोषण करू शकत नाहीत तर, काही जणांकडे त्याच्याकडे औषधांवर खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही. ते आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत जेव्हा त्यांच्या शरीराला वैद्यकीय मदत आणि उपचारांची आवश्यकता भासत आहे. काहींना स्वतःचे घर घ्यायचे आहे, मुलांची लग्न करायचे आहेत, काहींनी सेवेत असताना कर्ज घेतले ते फेडायचे आहे, अशा अनेक कारणांसाठी रक्कम मिळणे निकडीचे बनले आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जास्त काळ वाट पाहण्यास लावणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरत आहे.
अधिकारी व कर्मचारी यांची निवृत्ती लाभ हे बक्षीस नसून म्हातारपणातील एक पुंजी मानली जाते. या व्यक्तीला निवृत्तीवेतन देण्याची आणि निधी उभारण्याची नैतिक जबाबदारी ही बेस्ट प्रशासनाची आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाचे प्रशासन त्यांच्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची कायदेशीर देयके निर्धारित वेळेत प्रदान करण्यास अपयशी ठरली आहे.
खरे तर पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी १९७२च्या कायद्यामध्येच अशी तरतूद आहे की, नियुक्ताने ग्रॅज्युएटीची रक्कम देय झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे; परंतु गेली तीन वर्षे प्रशासन यात अपयशी ठरली आहे. लोक अदालत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ही बेस्ट उपक्रम आजपर्यंत आपला शब्द पाळू शकलेला नाही .
- अल्पेश म्हात्रे