‘आघाडी’तला पेच

  132

पंतप्रधान मोदी यांना घेरण्यासाठी नुकतीच विरोधी पक्षांची एक बैठक संसदेच्या अधिवेशनापूर्वी झाली आणि ती व्हर्च्युअल होती, पण ती सपशेल निष्फळ ठरली कारण विरोधी पक्षीयांची एकजूट त्यात दिसली नाही. त्यामुळे ही बैठक पूर्णपणे नाकाम झाली याला कारण आहे, ते मोदी सरकारविरोधात तावातावाने एकत्र आलेले विरोधक आपली रणनीती ठरवू शकले नाहीत आणि एकीही सिद्ध करू शकले नाहीत.


या बैठकीच्या पूर्वीच आप पक्षाने स्वतःला इंडिया आघाडीतून अलग केले. अरविंद केजरीवाल यांनी तशीच घोषणा बैठकीच्या काही तास अगोदर केली आणि या बैठकीतच काय होणार हे स्पष्ट झाले होते. केजरीवाल यांना राहुल गांधी यांनी खड्यासारखे बाजूला ठेवले होते आणि आज त्याच राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अपेक्षा करते की, त्यांनी आता काँग्रेसची साथ करावी. हे कसे काय होणार? राहुल यांचे नेतृत्व कुचकामी आहे, हे आतापर्यतच्या कित्येक निवडणुकात सिद्ध झाले आहे. शिवाय, त्यांची विरोधी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तयारीही नाही. काँग्रेसने आतापर्यंत प्रत्येक साथीदार पक्षांचा अनेकवेळा अवमान केला आहे आणि त्यांना जागा दाखवून दिली आहे.


असे कितीतरी पक्ष आहेत की, ज्यांनी काँग्रेसबरोबर राहून भाजपला टक्कर दिली पण काँग्रेसने वेळ आल्यावर त्यांना खाली पाडले आहे. काँग्रेसने ठराव केला होता की, ज्यात विरोधकांपैकी आता कुणालाही साथीला घ्यायचे नाही असे ठरवले होते. त्या जखमा ताज्या आहेत. त्या विसरून सारे विरोधी पक्ष साथ देतील असे काँग्रेसने समजणे चूक आहे आणि त्याचे प्रायश्चित्त राहुल यांच्या काँग्रेसला आता मिळाले आहे. बैठकीत तृणमूल काँग्रेस, स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते अनुपस्थित होते. ममता बॅनर्जी अनुपस्थित होत्या. पण त्यांचे प्रतिनिधी अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. यातून साध्य काय झाले तर विरोधकांची एकजूट दाखवण्यात विरोधी आघाडी अपयशी ठरली.


आप या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीला जे खिंडार पडले आहे तो अभूतपूर्व आहे. कारण आपला असा विश्वास होता की, भाजपला टक्कर देण्यात तोच एक समर्थ पक्ष आहे आणि शुचिर्भूतता काही ती आपल्याकडेच आहे. पण हा त्यांचा विश्वास दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सपशेल खोटा ठरवला आणि ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढणारे नेते म्हणून आपचे केजरीवाल यांनी लोकप्रियता साध्य केली होती, त्यांचे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुरते पानिपत झाले. काँग्रेसने त्यांना आपली जागा दाखवली आणि दिल्लीतील सत्ता टिकवण्यातही त्यांना अपयश आले.


त्यामुळे त्यांनी आता ‘एकला चलो रे’ हे गीत गाण्याचे ठरवले आहे. आपचे लक्ष्य २०२७ साली होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यामुळे त्यांना पंजावबवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडून आपले कार्य अधिक चांगले पार पाडता येईल असे त्यांचे लक्ष्य आहे. बाकी सारे पक्ष एकत्र आले असले तरीही त्यांची पंजाबमध्ये कॉंग्रेसशीच वाद आणि लढाई आहे. पूर्वी जनसंघ आणि भाजप तसेच समाजवादी पक्ष हे कॉंग्रेसविरोधात एकत्र कधीही येत नसत. कॉंग्रेसने जे स्थान तेव्हा मिळवले होते ते आज भाजपने मिळवले आहे. त्यामुळे भाजपविरोधात सारेच पक्ष बोलतात. परंतु प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग आला म्हणजे भाजपच्या वळचणीला जातात अशी विरोधकांची अवस्था आहे. हे पूर्वी कॉंग्रेसच्या बाबतीत व्हायचे. पण भाजपने स्वतःच्या अंगभूत निष्ठेच्या आणि कामाच्या ताकदीवर आज हे अढळ स्थान मिळवले आहे. कॉंग्रेसने भ्रष्टाचार आणि मतदानात धांदली करून सातत्याने निवडणुका जिंकल्या. त्यामुळे अजूनही राहुल गांधी मतादार याद्यांत घोळ घातल्याचा आरोप भाजपवर करत असतात. पण त्यात काही अर्थ नाही आणि निवडणूक आयोगाने सप्रमाण हे सिद्ध केले आहे.
व्हर्च्युअल बैठक पार पडली खरी, पण त्यात एकी दिसली नाही आणि बैठकीअगोदरच आप इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडीचे बारा वाजले आहेत. आता त्यात कॉंग्रेसच्या एकट्याच्या बळावर अधिवेशन पार पाडून दाखवायचे आहे. काँग्रेसला आता पुढील रणनीती ठरवायची तर मित्र पक्ष साथ द्यायला कुणी नाहीत. प्रत्येक पक्षाने काँग्रेसच्या दादागिरीचा अनुभव घेतल्याने ते आता काँग्रेसला फ्लोअर मॅनेजमेंटला साथ देतीलही, पण निवडणुकीत कितपत साथ देतील याची काहीच शाश्वती नाही. कारण पूर्वीचा अनुभव त्यांच्याकडे आहेच. या बैठकीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शप गटाचे नेते उपस्थित होते आणि अन्य काही नेते उपस्थित होते.


पण त्यांची ताकद नगण्य आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षांना एकत्र घेऊन मोदी सरकारशी टक्कर देणे अवघड जाणार आहे हे निश्चित. मोदी सरकारविरोधात कॉंग्रेस स्वतःच्या ताकदीवर लढू शकत नाही आणि एकत्रितपणे लडण्याची काँग्रेसची तयारी नाही. त्यामुळे इंडिया आघाडी पेचात सापडली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व कुचकामी आहे हे कधीच सिद्ध झाले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वप्न पहाणार असेल की मोदी यांना खाली खेचायचे तर ते दिवास्वप्नच ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला संताप बोलून दाखवला आहेच. महाविकास आघाडीचे बारा वाजण्याच्या बेतात आहेत आणि आता इंडिया आघाडीचे बारा वाजले आहेत. त्यामुळे भाजपला आणखी २०२९ पर्यंत तरी काही धोका नाही हे निश्चित आहे. कारण विरोधी पक्ष एकत्र येणार नाहीत आणि आले तरीही ते नेतृत्वासाठी आपसात लाथाळ्या करत रहाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

Comments
Add Comment

बोटावर निभावलं!

‘जीवावर बेतलेलं अखेर बोटावर निभावलं' म्हणून राज्याचे नूतन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी रात्री

अजेंडा फसला!

‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही', अशी टिप्पणी करत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास

‘लाडक्यां’चा घोटाळा

राज्यात लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या एनकेन कारणाने वादात आहे. ही सरकारी योजना केवळ

माँ तुझे सलाम...

पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण

‘दिव्या’ विजेती

भारतात उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर सारे चित्र पालटले आणि महिलांची सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या

शाळांच्या इमारतींचा धोका

बालकांना कळत्या वयापासूनच शालेय जीवनाशी समरस व्हावे लागते. एकेकाळी उजवा हात डाव्या कानाला लागल्याशिवाय