
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला 'देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,' दावा केला. जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली असल्याचे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुकही केले.
पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, भारतीय सैन्याच्या ताकदीचे रूप पाहिले. भारतीय सैन्याने ठरवलेले १०० टक्के लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून, दहशतवादी अड्डे २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली. जेव्हा जेव्हा मी परदेशातील सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. जेव्हा या अधिवेशनादरम्यान सभागृह विजयोत्सवाच्या भावनेने एका आवाजात व्यक्त करेल, तेव्हा भारताची लष्करी शक्ती मजबूत होईल. देशाला प्रेरणा मिळेल आणि लष्करी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामालाही चालना मिळेल. मेक इन इंडियाला चालना मिळेल. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मोदी म्हणाले.
देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वी देशात असा एक काळ होता जेव्हा महागाईचा दर दोन अंकी होता. आज, हा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याने, देशातील सामान्य लोकांच्या जीवनात एक दिलासा मिळाला आहे. २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, ज्याचे जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत."
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्ट असे ३२ दिवस चालणार आहे. १८ सत्रांमध्ये १५ हून अधिक विधेयके मांडली जाणार आहेत. यामध्ये ८ नवीन विधेयके असणार आहेत, तर उर्वरित प्रलंबित विधेयके असणार आहेत. बहुतांश कामकाज हे मुळ मुद्द्यावरून वाया जाण्याची शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरवरुन गोंधळ
ऑपरेशन सिंदूरवरून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप यश का आलेले नाही, असा सवाल केला. तसेच ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. तसेच ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा केल्यावरून देखील गोंधळ झाला. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, युद्धबंदीवरील डोनाल्ड ट्रम्पचे दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत घेरण्याची रणनिती तयार करण्यात आली आहे. यानुसार आज पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ट्रम्प यांचा दावा उचलण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आधीच प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू असे स्पष्ट केले होते. यानंतर विरोधकांनी ही मागणी सुरु केली.