
कल्याण: 'राग माणसाचा शत्रू असतो' हे पुन्हा एकदा कल्याणमधील एका घटनेतून सिद्ध झाले आहे. लग्न समारंभासाठी घेतलेल्या ३२ हजार रुपयांच्या लेहेंग्यावरून एका तरुणाने चक्क दुकानात गोंधळ घालत तो लेहेंगा चाकूने कापून टाकला आणि दुकानदाराकडे पैशाची मागणी केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
मेघना मखिजा या तरुणीने आपल्या लग्नासाठी एका दुकानातून ३२ हजार रुपयांचा लेहेंगा खरेदी केला होता. मात्र, नंतर तिला तो लेहेंगा पसंत न पडल्याने ती तो परत करण्यासाठी दुकानात गेली. दुकानदाराने लेहेंगा परत घेण्यास नकार देत, "एक महिन्यात लेहेंगा बदलून मिळेल" असे सांगितले. परंतु, मेघनाला लेहेंगा बदलून घेण्याऐवजी खरेदी केलेले पैसे परत हवे होते.
हा वाद सुरू असतानाच, मेघनाचा होणारा पती सुमित सयानी दुकानात दाखल झाला. त्याने कोणताही विचार न करता, थेट हातात चाकू घेऊन तो लेहेंगा तिथेच कापून टाकला! या अनपेक्षित प्रकारामुळे गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या दुकानदाराने तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या घटनेबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जण दुकानदाराला चुकीचे ठरवत आहेत, तर बहुसंख्य लोकांनी मात्र लेहेंगा कापणाऱ्या तरुणाला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, दोषींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.