Friday, August 15, 2025

डिजिटल पेमेंटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर!

डिजिटल पेमेंटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर!

यूपीआयद्वारे दरमहा १८०० कोटींहून अधिक व्यवहार

नवी दिल्ली : जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारताने जगात पहिले स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणनिधीच्या अलीकडील अहवालानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) मुळे भारताने डिजिटल व्यवहारांमध्ये हे स्थान मिळवले आहे. २०१६ मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सुरू केलेले युपीआय आज देशात पैशांचे व्यवहार करण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग बनला आहे. युपीआयच्या मदतीने, लोक त्यांच अनेक बैंक खाते एकाच मोबाइल अॅपशी लिंक करू शकतात आणि काही सेकंदात सुरक्षित, कमी किमतीचे व्यवहार करू शकतात.

भारतातील ८५% डिजिटल पेमेंट यूपीआयद्वारे

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार, यूपीआयद्वारे दरमहा १८ अब्जाहून अधिक व्यवहार होतात. जून २०२४ मध्ये, यूपीआयने १८.३९ अब्ज व्यवहारासह २४.०३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला, तो गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये १३.८८ अब्ज व्यवहार (१३८८ कोटी) च्या तुलनेत ३२% वाढ दर्शवितो. यूपीआयने भारताला रोख आणि कार्ड-आधारित पेमेंटपासून दूर आणि डिजिटल-प्रधान अर्थव्यवस्थेकडे नेले आहे. हे व्यासपीठ केवळ मोठ्या व्यवसायांसाठीच नव्हे, तर लहान दुकानदार आणि सामान्य लोकांसाठी देखील आर्थिक व्यवहारासाठी एक मजबूत साधन बनले आहे. आज, भारतातील ८५% डिजिटल पेमेंट यूपीआयद्वारे होत आहेत, जे ४९.१ कोटी वापरकर्ते, १६.५ कोटी व्यावसायिक आणि ६७५ बँकाना एकाच व्यासपीठावर जोडते. इतकेच नाही, तर यूपीआय आता जागतिक स्तरावर देखील सुमारे ५०% रिअल-टाइम डिजिटल पेमेंट हाताळत आहे.

यूपीआयचा प्रभाव भारताबाहेरही

यूपीआयचा प्रभाव आता भारताच्या सीमेपलीकडे दिसून येतो. ते सात देशांमध्ये देखील उपलब्ध आहे. युएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस, फान्समध्ये युपीआय लाँच केल्याने युरोपमधील पहिले पाऊल पडले आहे, ज्यामुळे परदेशात राहणा-या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीयांना पेमेंट करणे सोपे झाले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, ही केवळ संख्याची बाब नाही, तर ती भारताच्या डिजिटल फ्रेमवर्कवरील वाढत्या विश्वासाचे आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जलद पावले उचलण्याचे प्रतिबिंब आहे.

Comments
Add Comment