Thursday, October 23, 2025
Happy Diwali

'मैं मराठी नहीं बोलुंगी' : परप्रांतिय महिलेचा ग्राहकांना दम, घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला!

'मैं मराठी नहीं बोलुंगी' : परप्रांतिय महिलेचा ग्राहकांना दम, घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला!

महिलेचा 'हिंदीतच बोला'चा आग्रह, व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे, त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतीय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकेच नाही, तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिने हिंदीतच बोलण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते. या दुकानातील मूळ बिहारची असलेल्या एका महिलेने त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा मराठीत बोला, असे ग्राहकांनी तिला सांगितले, पण तिने मराठी बोलण्यास नकार दिला आणि येथूनच वादाची ठिणगी पडली.

"आम्ही हिंदुस्तानात राहतोय, हिंदीमध्ये बोला," असे म्हणत ती महिला भांडताना दिसत आहे. "मराठीत नाही तर हिंदीतच बोलायचं," असा दमही देताना ती दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, तो आता समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा असेल असे जाहीर केले आणि त्यानंतर हा वाद अधिकच वाढल्याचे दिसून आले. त्याच्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आवाज उठवला आणि सरकारने हा निर्णय मागे घेतला.

मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरून मिरा रोडमधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्याच्या विरोधात मिरा भाईंदरमधील सर्व अमराठी व्यापाऱ्यांनीजुलै रोजी आपली दुकाने बंद करून, डीसीपी (DCP) कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनेही ८ जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला.

मिरा रोडमधील सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिले. "हिंदी सक्ती लागू करून दाखवाच, दुकानंच नाही तर शाळाही बंद करणार," असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. "मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे," असे म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना प्रतिआव्हान दिले. "मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच," असे म्हणत राज ठाकरेंनी मराठीद्वेष्ट्यांनाही थेट इशारा दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >