भारत, बांगलादेशाचे वाढले टेन्शन
बिजिंग : तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास चीनने सुरुवात केली आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून, डिसेंबर २०२४ मध्येच चीनने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. तिबेटमध्ये या धरणाला यारलुंग त्सांगपो आणि भारतात ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखले जाते; परंतु चीनच्या या प्रकल्पाला भारताने विरोध केला आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेजवळील तिबेटमधील ब्रह्मपुत्र नदीवर १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या धरणाच्या बांधकामाला औपचारिक सुरुवात केली. चीनचा हा जगातील सर्वात मोठा वजलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत चीन पाच हायड्रो पावर स्टेशन उभारणार आहे. यासाठी सुमारे १.२ ट्रिलियन युआन म्हणजे सुमारे १६७ अब्ज डॉलर्सचा खर्च होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे तिबेटमध्ये न्यिंगची येथे उत्पादित होणारी वीज मोठ्या प्रमाणात इतर प्रदेशांमध्ये पाठवली जाईल. चीनने दावा केला आहे की हा प्रकल्प कार्बन न्यूट्रल उद्देशांसह तिबेटच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत करेल. या प्रकल्पातून तयारी होणारी वीज चीनच्या भागांमध्ये वापरली जाईल. तसेच याचा काही भाग स्थानिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे चीन सरकारचे म्हणणे आहे. हे धरण हिमालय पर्वतरांगांमधील एका विस्तीर्ण दरीत बांधले जाणार आहे. जिथे ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मोठा यू-टर्न घेते.
भारत-बांगलादेशावर परिणाम
या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशातील लाखो लोकांवर जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस धरणापेक्षाही हे धरण मोठे असू शकते, अशी माहिती शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. भारताने चीनच्या या प्रकल्पावर चिंता दर्शवली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या या प्रकल्पामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या कालच्या प्रवाहातील भारतीय राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे; परंतु चीनने या प्रकल्पामुळे कोणताही नकारात्मक परिमाण होणार नसल्याचे म्हटले आहे.