
लक्षद्वीपमधील बेट केंद्र सरकार घेणार ताब्यात
नवी दिल्ली : लक्षद्वीपमधील बित्रा बेट राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सामाजिक परिणाम मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे बेटावरील स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता आणि चिंता पसरली आहे.
बित्रा हे लक्षद्वीपच्या १० वस्ती बेटांपैकी एक असून, सध्या येथे १०५ कुटुंबे राहतात. या बेटावरील रहिवाशांची एकूण लोकसंख्या सुमारे ३५० इतकी आहे. बेटाचे क्षेत्रफळ अंदाजे ०.०९१ चौ. कि.मी. असून ४५ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा मोठा लॅगून आहे. हे लॅगून भाग मुख्यतः स्थानिक मच्छीमारांद्वारे मासेमारीसाठी वापरला जातो.
लक्षद्वीप महसूल विभागाने ११ जुलै रोजी अधिसूचना जारी करत ते संरक्षण उद्देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत सामाजिक परिणाम मूल्यांकनासाठी आदेश दिला आहे. बित्रा बेटाची पूर्ण मालमत्ता संरक्षण आणि धोरणात्मक यंत्रणांकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शिवम चंद्र यांनी स्पष्ट केले आहे. एसआयए दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि स्थानिक ग्रामसभा, रहिवासी यांचा यामध्ये सहभाग राहील. ही प्रक्रिया ‘भूमी संपादन, पुनर्वसन व स्थलांतर अधिनियम २०१३’ अंतर्गत करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
सरकारने स्थानिक जनतेच्या जीवनशैलीचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया लक्षद्वीपचे खासदार हामदुल्ला सईद यांनी दिली आहे.